मुंबई : मुंबईत होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी २१ ते २३ मे या कालावधीत बेस्ट उपक्रम अधिकृत वाहतूक भागीदार आहे. त्यामुळे जी-२० परिषदेशी संबंधित प्रतिनिधींना मुंबईतील प्रवासासाठी बेस्टच्या ताफ्यातील बस पुरवल्या जात आहेत. रविवारी जी-२० च्या पर्यावरण गटातील प्रतिनिधींसाठी बेस्टच्या नव्याने सुरू झालेल्या विद्युत प्रीमियम बसचा वापर करण्यात आला.
जी-२० प्रतिनिधींच्या वाहतुकीसाठी अधिकृत असणारी देशातील पहिली शहर वाहतूक सेवा ठरणे बेस उपक्रमासाठी अभिमानाचा क्षण आहे. जी-२० प्रतिनिधींना घेऊन जाण्याची संधी दिल्याबद्दल भारत आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. बेस्टच्या प्रीमियम विद्युत बसद्वारे त्यांच्यासाठी आरामदायी आणि गतिशील सेवा देऊ. आम्हाला आशा आहे की, या बसमधून प्रवास करणाऱ्या जी-२० प्रतिनिधींमुळे सर्व मुंबईकरांना ही सेवा वापरण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमाने नुकताच आरामदायी, वेगवान अॅप आधारित प्रीमियम बस सेवा सुरू केली आहे. या सेवा ठाणे ते वांद्रे-कुर्ला संकुल, खारघर ते विमानतळ या मार्गावर धावते. सध्या प्रीमियम बससेवेमध्ये दररोज सात हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. सध्या बेस्टच्या ताफ्यात ६० प्रीमियम वातानुकूलित बस असून येत्या आठवडय़ात आणखीन ४० बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे बेस्टकडील प्रीमियम बसची एकूण संख्या १०० होणार आहे.