कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बेस्ट प्रशासन गंभीर नाही त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सुमारे ३०,५०० बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना स्टेशनपर्यंत किंवा स्टेशनवरुन कार्यालय गाठण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, संप केल्यास कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.

खासगी टॅक्सीचालक या संपाचा फायदा उचलून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. या संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरु आहेत. आम्ही संपावर ठाम आहोत, त्यामुळे हा संप होणार आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्रकुमार बागडे हे उपस्थित राहिले नाहीत. ही बैठक केवळ दिखाव्यासाठी होती, ते कामगारांच्या मागण्यांबाबत गंभीर नाहीत. दोन वर्षांपासून आमचे प्रश्न सोडवण्यात त्यांना रस नाही. त्यामुळे बेस्टचे ३० हजार ५०० कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत, असे बेस्ट वर्कर युनिअनच्या नेत्यांनी सांगितले होते.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या असून यामध्ये प्रथम २००७पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्माचाऱ्यांना मिळणाऱ्या रुपये ७३९० या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतननिश्चिती केली जावी तसेच एप्रिल २०१६पासून लागू होणाऱ्या नव्या वेतनकरारावर तातडीने काम सुरु करावे. बेस्टचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत मंजूरी देण्यात आलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे. तसेच २०१६-१७ आणि त्यापुढील वर्षासाठी पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस, निवासस्थानाचा प्रश्न तसेच अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी या मागण्या बेस्ट कर्मचारी संघटनेने प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.

Story img Loader