मुंबई : बेस्टच्या विद्युत विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली. विद्युतपुरवठा विभागातील जोडारी सहाय्यक (जॉइंटरमेट) या पदासाठी बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांकडूनच अर्ज मागवले आहेत.बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाची आधीच दुर्दशा झालेली असताना आता विद्युतपुरवठा विभागही चर्चेत आला आहे. बेस्टचा विद्युतपुरवठा विभाग अद्याप नफ्यात आहे. मात्र विद्युत विभागातही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छापील बिले वितरित करण्यासाठी कर्मचारी नाहीत, मीटर वाचनासाठी कर्मचारी नाहीत अशी परिस्थिती असल्यामुळे बेस्टचा विद्युतपुरवठा विभागही सध्या अडचणीत आहे. त्यातच बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर कोणीही प्रशासकीय अधिकारी येण्यास तयार नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रम सध्या निर्णायकी आहे. सध्या बेस्टच्या कारभाराची तात्पुरती सूत्रे मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवली आहेत. गेल्या आठवड्यात बेस्ट कामगार सेनेने जोशी यांची भेट घेऊन बेस्ट उपक्रमाच्या अडचणीचा पाढा वाचला. यावेळी परिवहन विभागाबरोबरच विद्युतपुरवठा विभागातील समस्यावरही चर्चा करण्यात आली.

बेस्ट उपक्रमातील विविध पदे रिक्त असल्यामुळे त्याचा ग्राहक सेवेवर परिणाम होत असून विद्युतपुरवठा विभागाचेही नुकसान होत असल्याचा मुद्दा कामगार सेनेच्या सदस्यांनी मांडला. विद्युत विभागातील पदभरतीबाबत यापूर्वीच निर्णय झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे ही पदभरती लवकर सुरू करण्याचे आदेश जोशी यांनी बेस्टच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने आता भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जोडारी सहाय्यक पदासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र असलेल्या कायम स्वरूपी अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्हता प्राप्त उमेदवारांची अंतिम मुलाखत व्यवसाय प्रकारांनुसार व योग्यतेनुसार घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्रधारक

मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे सामान्यज्ञान व प्रभुत्व आवश्यक

विद्युतपुरवठा विभागातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक

अर्ज करण्याची अंतिम तारीख

संबंधित कागदपत्रांसह ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज सादर करावेत उप संचालक कार्यालय, वीज विभाग, दुसरा मजला, शिवाजी नगर औद्योगिक वसाहत, मुंबई – ४०००१५