सुशांत मोरे
बसफेऱ्या अन्य मार्गावर वळवल्याने प्रवाशांची सरासरी १५-२५ मिनिटे वाया; चार धोकादायक पुलांवरील उंचीमर्यादा हटवण्याची मागणी
धोकादायक ठरल्यामुळे अवजड वाहतुकीला बंद करण्यात आलेल्या पुलांवर वाहनांसाठी आखून दिलेल्या उंचीच्या मर्यादेचा फटका ‘बेस्ट’ उपक्रमाला आणि त्यातून प्रवास करणाऱ्यांना बसू लागला आहे. या उंची मर्यादेमुळे बेस्टच्या दररोजच्या २ हजार ११७ फेऱ्यांना लांबचा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागते. यामुळे ‘बेस्ट’चे इंधन वाया जात आहेच; पण प्रत्येक प्रवाशाचा सरासरी १५ ते २५ मिनिटांचा वेळही वाया जात आहे.
प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी बेस्ट बसकरिता या पुलावरील उंचीची मर्यादा शिथिल करण्यात यावी आणि या पुलांचे काम लवकरात पूर्ण करावे, अशी मागणी बेस्टतर्फे पालिकेकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘बेस्ट’ने बसफेऱ्या, एकूण प्रवासी आणि वाया जाणारा वेळ यांच्या आधारे वेळेच्या अपव्ययाचे गणित मांडले असून त्यानुसार पर्यायी मार्गामुळे बेस्ट प्रवाशांचे रोजचे एकत्रितपणे ४० हजार ४२५ तास वाया जात असल्याचा उपक्रमाचा अहवाल आहे.
मुंबईतील धोकादायक ठरलेल्या मजास ते फिल्टर पाडा, घाटकोपर ते लक्ष्मीनगर, गोरेगाव ते एस.व्ही.रोड पुलांवर गेल्या सात महिन्यांपासून अवजड वाहनांना बंदी घातण्यात आली आहे. तर ग्रॅण्ट रोडमधील फेररे उड्डाणपुलावरून तीन महिन्यांपासून अवजड वाहनांना बंदी आहे. या बंदीमध्ये बेस्ट बसगाडय़ांचाही समावेश आहे. नियम धुडकावून अवजड वाहने जाऊ नये यासाठी पुलांवर २.५ मीटर उंचीच्या कमानी बसविण्यात आल्या आहेत. या बंदीमुळे पुलावरून जाणाऱ्या बसगाडय़ांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र पर्यायी मार्गामुळे बेस्ट प्रवासाचा वेळ लांबला आहे. पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी, अनधिकृत वाहनतळ, फेरीवाले, रस्त्यांची खोळंबलेली कामे यांमधून वाट काढताना बेस्ट प्रवासाचा वेळ आणखी वाढतो.
या पद्धतीने २,११७ बसफेऱ्यांना वळसा घालावा लागत असल्याने प्रवाशांचाही वेळ वाया जातो. पर्यायी मार्गामुळे तीन ते चार किलोमीटर अधिक अंतर कापावे लागते. त्यामुळे प्रत्येक फेरीमागे १५ ते २५ मिनिटे जादा मोजावे लागतात. याचा हिशोब केल्यास प्रवाशांचे ४० हजार ४२५ तास वाया जात असल्याचे बेस्टने म्हटले आहे.
घाटकोपर ते लक्ष्मीनगर येथील पुलावरून दररोज ९४८ बस फेऱ्या जात होत्या. मात्र यातील प्रत्येक फेरीला ३.८ किमी जादा अंतर कापावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे दररोजचे १८ हजार ९६० तास वाया जातात. तीच परिस्थिती ग्रॅण्ट रोड येथील फेररे उड्डाणपुलाचीही आहे. या पुलावरून तीन महिन्यांपूर्वी जाणाऱ्या रोजच्या ६१५ बस फेऱ्यांना दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्याने ९ हजार २२५ तास वाया जात असल्याचे सांगण्यात आले.