विजेची गरज भागवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत मुंबई शहराला वीज पुरवणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाने प्रतिवर्षी ३१.५ दशलक्ष युनिट सौरऊर्जा घेण्यासाठी करार केला आहे. यामुळे सौरऊर्जा वापरण्याबाबत राज्य वीज नियामक आयोगाने दिलेले लक्ष्य साध्य करण्यास ‘बेस्ट’ला मदत होणार आहे. राज्यातील प्रत्येक वीज कंपनीने आवश्यक असलेल्या एकूण विजेपैकी विशिष्ट प्रमाणात अपारंपरिक ऊर्जा घ्यावी, असे बंधन महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने घातले आहे. ‘बेस्ट’ची वीज मागणी लक्षात घेता त्यांना सुमारे १२२ दशलक्ष युनिट इतकी सौरऊर्जा आहे. ‘वेल्स्पन एनर्जी महाराष्ट्र प्रा. लि.’ या कंपनीबरोबर ‘बेस्ट’ने २० मेगावॉट सौरऊर्जा खरेदी करण्यासाठी करार केला असून २०१३-१४ पासून पुढील २५ वर्षे ही कंपनी ‘बेस्ट’ला प्रतिवर्षी सुमारे ३१.५ दशलक्ष युनिट सौरऊर्जा पुरवणार आहे.