मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’, ‘टाटा पॉवर कंपनी’ आणि ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या वीजदरात आज १ एप्रिलपासून बदल होत आहे. राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ‘बेस्ट’ आणि ‘टाटा पॉवर’च्या घरगुती वीजदरात वाढ होत असताना ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या वीजदरांमध्ये मात्र कपात होणार आहे. त्यामुळे आता मुंबईत ३०० युनिटपर्यंतच्या छोटय़ा ग्राहकांसाठी ‘टाटा पॉवर’ स्वस्त वीजपुरवठादार ठरणार आहे, तर बडे घरगुती ग्राहक आणि व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी उपनगरांत रिलायन्स स्वस्त ठरणार आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने २०१३-१४ पासून बहुवार्षिक वीजदर पद्धत आणली आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’च्या घरगुती ग्राहकांचा वीजदर प्रति युनिट २० पैशांपासून ते एक रुपया ५५ पैशांपर्यंत वाढणार आहे. तशात परिवहन व्यवसायातील तोटय़ाचा भार कायम राहणार आहे. परिणामी ‘बेस्ट’च्या वीजग्राहकांचा दर महिन्याचा खर्च २० रुपयांपासून ७७६ रुपयांपर्यंत वाढणार आहे. ‘टाटा पॉवर’च्या वीजग्राहकांच्या दरात प्रति युनिट ३६ पैशांपासून एक रुपया ३१ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

परिणामी ‘टाटा’च्या घरगुती ग्राहकांचा विजेवरील खर्च वीजवापरानुसार दर महिन्याला ३६ रुपयांपासून ते ६५६ रुपयांनी वाढणार आहे.
आयोगाच्या आदेशानुसार ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’चे आताच्या तुलनेत वीजदर मात्र कमी होत आहेत. ‘रिलायन्स’च्या घरगुती ग्राहकांच्या दरात प्रति युनिट एक पैशापासून ते तब्बल तीन रुपये २० पैशांनी कपात करण्यात आली आहे. परिणामी ‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांना दरमहा एक रुपयापासून ते १६०३ रुपयांपर्यंतचा दिलासा मिळणार आहेच. शिवाय स्वस्त वीजदरापोटी ‘टाटा’कडे स्थलांतरित झालेले बडे वीजग्राहक परत ‘रिलायन्स’ची वाट धरण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा