मुंबई शहर व उपनगरांत बेस्ट व टाटा पॉवर सारख्या वीज कंपन्यांनी आगामी वर्षांत लक्षणीय वीज दरवाढ प्रस्तावित केली असताना उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मात्र आगामी २ वर्षांसाठी कसलीही वीज दरवाढ मागितलेली नाही. त्यामुळे मुंबई उपनगरांतील सामान्य घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
आगामी तीन वर्षांसाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बहुवार्षिक वीजदर प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. वीज खरेदी खर्चात मोठय़ा प्रमाणावर कपात होणार असल्याने रिलायन्सच्या वीज ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे. वीजखरेदी खर्चात कपात झाल्यामुळे वीजपुरवठय़ाचा खर्चही आटोक्यात राहणार आहे. त्यामुळे १०० ते ५०० युनिटपर्यंतच्या वेगवेगळ्या गटांतील घरगुती वीज ग्राहकांना आगामी वर्षांत कसलीही दरवाढ करू नये असे रिलायन्सने प्रस्तावित केले आहे. तर दरमहा ५०० युनिटपेक्षा जास्त वीजवापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात ३ टक्क्यांची कपात करावी अशी सूचनाही रिलायन्सने केली आहे.
मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टच्या वीजदरात परिवहन सेवेतील तोटय़ामुळे मोठी दरवाढ होणार आहे. तर टाटा पॉवरने घसघशीत दरवाढ सुचविली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या आणि सर्वात महाग वीजसेवा देणाऱ्या रिलायन्सच्या ग्राहकांमध्ये आगामी वर्षांत कसलीही दरवाढ प्रस्तावित नसल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रिलायन्सचे सुमारे २७ लाख वीज ग्राहक आहेत.

Story img Loader