* अ‍ॅडलॅब्ज इमॅजिकाशी करार
* आठवडाअखेरीस एक वातानुकूलित बस धावणार
* विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही मासिक पास
परिवहन विभागाच्या तोटय़ामुळे दरवर्षी आíथकदृष्टय़ा गत्रेत जाणाऱ्या बेस्ट प्रशासनाने आता उत्पन्नवाढीसाठी विस्तारीकरणाचे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत फक्त दाराशी येणाऱ्या प्रवाशांना सेवा देणाऱ्या बेस्टने आता प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचे धोरण हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्ट उपक्रम आता अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका या करमणूक उद्यानासाठी आपल्या वातानुकूलित बसगाडय़ा चालवणार आहे. त्याबाबतचा करार अ‍ॅडलॅब्ज इमॅजिकासह झाला असून, २८ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे बेस्ट ठरावीक रक्कम घेऊन या बसगाडय़ा देणार असल्याने बेस्टला या करारात फायदा होणार आहे. त्याचबरोबर बेस्टने विविध सरकारी आणि खासगी आस्थापनांसह करार केले असून त्यातूनही मासिक पासचा खप वाढवला आहे.
बेस्टच्या अर्थसंकल्पावर आपले मत मांडताना मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी बेस्टने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची गरज बोलून दाखवली होती. त्यासाठी आयपीएल किंवा मोठमोठय़ा मदानांत होणाऱ्या मेळाव्यांसाठी बसगाडय़ा उपलब्ध करून देणे, विविध योजना राबवणे आदी गोष्टींचा पर्यायही त्यांनी बेस्ट प्रशासनासमोर ठेवला होता. यावर भाष्य करताना बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी बेस्टने याआधीच अशी पावले उचलली असल्याची माहिती दिली. बेस्टने अ‍ॅडलॅब इमॅजिकासह करार केला असून, खोपोलीजवळ असलेल्या या मनोरंजन उद्यानात पोहोचण्यासाठी मुंबईहून अ‍ॅडलॅबला बसची व्यवस्था हवी आहे. बेस्टने त्यांना सध्या एक वातानुकूलित बसगाडी देण्याचे निश्चित केले आहे. ही बस शनिवार-रविवार हे दोन दिवस आणि सरकारी सुट्टय़ांच्या दिवशी मुंबईहून अ‍ॅडलॅबकडे रवाना होणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. ही सेवा २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, दर फेरीचे १५ हजार रुपये आणि चालकाचा खर्च एवढी रक्कम बेस्ट प्रशासनाला मिळणार आहे.
दरम्यान, बेस्टने उत्पन्नवाढीसाठी आता काही खासगी कंपन्या व सरकारी कार्यालये यांच्याशीही संवाद साधला असून, त्याचे चांगले परिणाम दिसू लागल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. मुंबई (बॉम्बे) पोर्ट ट्रस्टने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ६०० मासिक पास विकत घेतले असून, त्यापोटी बेस्टला २.८० लाख रुपये मिळाले आहेत. त्याशिवाय बीपीसीएलने ५५ पास (२९ हजार रुपये), एमपीएससीने ५५ पास (२९ हजार रुपये), डायमण्ड मार्केटच्या कर्मचाऱ्यांनी ८० हजार रुपयांचे मासिक पास विकत घेतल्याने बेस्टकडे ठोस उत्पन्न आगाऊ जमा झाल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली. अशा विविध उपाययोजना करून बेस्टने उत्पन्नवाढीसाठी नवनवीन पर्याय शोधण्याचा विचार केला आहे. समिती सदस्यांनी केलेली आयपीएल किंवा अशा मोठय़ा कार्यक्रमांबाबतची सूचनाही बेस्ट प्रशासन विचारात घेणार आहे. पुढील वर्षी प्रवासी संख्या वाढवण्याबरोबरच प्रवासी उत्पन्नातही वाढ करण्याचे उद्दिष्ट बेस्टने ठेवले आहे, असेही महाव्यवस्थापक डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा