बस प्रवाशांची वडाळा आगारापर्यंतची पायपीट थांबवण्यासाठी ‘बेस्ट’चा निर्णय
बेस्टच्या प्रवासात ‘सुट्टे पैसे’ नाहीतर गाडीतून उतरा किंवा पैसे मिळवण्यासाठी वडाळा आगारात या, असे ठणकावून सांगणाऱ्या चालकांत आणि प्रवाशांमधील वाद मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. मात्र लवकर बेस्टच्या तिकिटांची शिल्लक रक्कम घराजवळील आगारांतूनही प्रवाशांना मिळवता येणार आहे. त्यामुळे सुट्टे पैसे घेण्यासाठी वडाळा आगारात खेटे मारणाऱ्या हजारो प्रवाशांची यातून सुटका होणार आहे.
सध्या बेस्टचे २७ आगारांतून रोज ४ हजारांहून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात. यांतून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २९-३० लाखांच्या घरात आहे. यात रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. यात बेस्टच्या तिकिटांसाठी ८ तसेच १४ रुपये अशी किंमत मोजावी लागत असल्याने अनेकदा १०० किंवा ५०० रुपयांची नोट देणाऱ्या प्रवाशांची तसेच वाहकांची यात कोंडी होत असते. त्यामुळे बेस्टच्या तिकिटांवर शिल्लक रक्कम लिहून ती वडाळा आगारातून जमा करण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र उपनगरात काढलेल्या तिकिटाचे पैसे मिळवण्यासाठी प्रवाशांना वडाळा आगारात जावे लागत होते. त्यातही रविवारी सुटीच्या दिवशी आगाराचे कामकाज बंद असल्याने प्रवाशांना शिल्लक रक्कम मिळवताना खेटे मारावे लागत होते. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने तिकिटावर लिहिलेली शिल्लक रक्कम सर्व आगारांतून देण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटांची ही शिल्लक रक्कम आगारातून मिळवण्यासाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत तर शनिवारी सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत मिळवता येणार आहे.
शिल्लक कशी मिळवाल?
बेस्टच्या वाहकाने तिकिटांवर शिल्लक रक्कम लिहून दिल्यास कोणत्याही आगारात जाऊन ती रक्कम मिळवता येणार आहे. यासाठी प्रवाशांना तिकीट किंवा तिकिटाची प्रत सादर करावी लागणार आहे. ही सुविधा आगारांसह संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्याचा बेस्टचा मानस आहे.