मुंबई : मुंबई महापालिकेन बेस्टला जाहीर केलेल्या अनुदानापैकी पहिली १०० कोटींची रक्कम नुकतीच बेस्ट प्रशासनाला देण्यात आली. मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानातून कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्तीची थकबाकी द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच बेस्टला दिले होते. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

बहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ॲण्ड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून तब्बल १००० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. त्यापैकी पहिला १०० कोटी रुपयांचा हफ्ता मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला नुकताच दिल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या निधीतून आता बेस्ट उपक्रम कर्मचाऱ्यांची देणी देणार का याबाबत उत्सुकता आहे.

बेस्ट उपक्रमाचा संचित तोटा वाढत असून बेस्टचा देनंदिन खर्च भागवणे, कामगारांचे पगार देणेही मुश्कील होऊ लागले आहे. त्यामुळे बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी बेस्टने गेल्या कित्येक वर्षांपासून दिलीच नव्हती. निवृत्ती वेतनाचा लाभ २०१६ पासून न मिळलेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने १२७ कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीची थकबाकी देण्याचे आदेश दिले होते.

बेस्टकडे देणी देण्यासाठी निधी नसल्यामुळे मुंबई महापालिकेने दिलेल्या अनुदानावर सध्या बेस्टचा कारभार सुरू असल्याचे बेस्ट प्रशासनाने न्यायालयात सांगितले होते. मुंबई महापालिकेकडून मिळणारे अनुदान अथवा वित्तीय संस्थेकडून मिळणाऱ्या कर्जातून १२७ कर्मचाऱ्यांची देणी द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच १५ एप्रिलपर्यंत महापालिकेकडून मिळालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानातून १०० कोटी रुपये याचिकाकर्त्यांना देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने १०० कोटी रुपये नुकतेच बेस्टला दिले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बेस्ट उपक्रमाने आपला अर्थसंकल्प सादर करताना पालिका प्रशासनाकडे दोन हजार कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी अनुदानाची मागणी केली होती. मात्र मुंबई महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात बेस्टला ८०० कोटी रुपये देण्यात आले होते. बेस्टला मदत करताना पालिका प्रशासन हात आखडता घेत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. मात्र २०१२ पासून बेस्टला तब्बल ११,३०४ कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने आधीच जाहीर केली आहे.

बसखरेदीसाठीही निधी नव्या आर्थिक वर्षात बेस्टला १००० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १५ व्या वित्त आयागोकडून महापालिकेला निधी देण्यात येतो. त्यापैकी ९९२ कोटी रुपये विद्युत बसगाड्या खरेदीसाठी देण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ व्या वित्त आयोगाकडून यापैकी ४९३ कोटी रुपये निधी देण्यात आला असून उर्वरित रक्कम बेस्टला देण्यात येणार आहे.