आरे वसाहतीत बिबळ्याचे वास्तव्य असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. बिबटय़ांचे हे वास्तव्य तेथील काही पाडय़ांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुळावर आले होते. बिबळ्याच्या धाकाने या मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते. मात्र ‘बेस्ट’ने या मुलांच्या शाळेच्या वेळेत तीन बस सुरू करून या मुलांच्या शिक्षणाचा ‘मार्ग’ निर्धोक केला आहे. ही खास सेवा मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे.
आरे वसाहतीतील घनदाट झाडी, छोटा काश्मीर येथील तलाव, बाजूलाच असलेला डोंगर यांमुळे येथे अनेकदा बिबळ्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. आरे वसाहतीत अनेक छोटेछोटे पाडे आहेत. या पाडय़ांमधील मुले पायीपायी जवळच्या महापालिका शाळेत जातात. काही दिवसांपासून या भागातील बिबळ्याचा वावर वाढला आहे. बिबळ्याने मानवी वस्तीतील कुत्रे उचलून नेण्याच्या घटनाही घडल्या होत्या.
मुलांची शाळेत जाण्याची वाट बिबळ्याचा वावर असलेल्या जागेजवळच असल्याने अनेक पालकांना मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटत होती. हिवाळ्यात सूर्य उशीरा उगवून लवकर मावळत असल्याने सकाळच्या शाळेला जाताना मुलांनाही बिबळ्याचा धाक वाटत होता. तसेच संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येताना अंधारल्याने मुले बिचकत होती. त्यामुळे या मार्गावर खास शालेय मुलांसाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी या पालकांनी ‘बेस्ट’ प्रशासनाकडे केली होती. ‘बेस्ट’ने या मागणीची दखल घेत मंगळवारपासून या मार्गावर खास शालेय मुलांसाठी तीन विशेष बस सुरू केल्या आहेत. या बस सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या पाडय़ांमधून फिरत मुलांना शाळेत नेण्या-आणण्याचे काम करणार आहेत. या बसचे तिकीट विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच सवलतीच्या दरातच मिळणार आहे.
आरे कॉलनीतील मुलांचे बिबळ्यापासून ‘बेस्ट’ रक्षण
आरे वसाहतीत बिबळ्याचे वास्तव्य असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. बिबटय़ांचे हे वास्तव्य तेथील काही पाडय़ांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या
First published on: 14-11-2013 at 03:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best to provide security from leopard to are colony students