मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या दुमजली वातानुकूलित बसला प्रवाशांकडून पसंती मिळत असून प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने उपनगरांतही दुमजली वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपनगरातील रस्त्यांवर लवकरच १९ दुमजली वातानुकूलित बस धावणार आहेत. कुर्ला, वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) या भागात प्रथम १० बस, तर पुढील कालावधीत उर्वरित ९ बस सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> भटक्या श्वानांना जेवण देताना अश्लील शेरेबाजी, जाब विचारल्यावर महिलेला मारहाण अन्…; बोरिवलीत धक्कादायक घटना
बेस्ट उपक्रमाची बस प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. प्रवाशांची सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी बेस्ट उपक्रम विविध उपाययोजना करीत आहे. उपक्रमाने फेब्रुवारी २०२२ मध्ये बेस्टच्या ताफ्यात वातानुकूलित बसगाड्यांचा समावेश केला. या बसगाड्या पर्यावरणस्नेही असल्याचा दावा करण्यात येत आहे.. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाड्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे, तसेच मोबाइल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात एकूण ३९ वातानुकूलित बस आहेत. त्यापैकी २० गाड्या दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून धावत आहेत. जुन्या दुमजली बसगाड्या शासन निर्णयानुसार मोडीत काढल्यामुळे कुर्ला, बीकेसी येथील नागरिकांची सध्या गैरसोय होत आहे. लवकरच उपनगरात १० दुमजली वातानुकूलित बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने उर्वरित नऊ बसगाड्या उपनगरात सुरू करण्यात येणार आहेत. स्विच मोबिलिटी या कंपनीला बस पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले असून २०० दुमजली वातानुकूलित बसगाड्या पुरविण्याचे कार्यादेश बेस्ट उपक्रमाने दिले आहेत. कंपनीने २०० पैकी ३९ बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या स्वाधीन केल्या आहेत. उर्वरित बस २०२४ च्या अखेरीस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मुंबईतील एकूण १२ बस आगरात दुमजली वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.