मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला (बेस्ट) गेल्या आठवड्यात दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्जा कार्यक्षमता पुरस्कार आणि परिवहन उत्कृष्टता पुरस्कार बेस्टला देण्यात आले. बेस्टच्या परिवहन विभागाची दुर्दशा झाली असून कामगारांचे पगार देणेही मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत हे उत्कृष्टता पुरस्कार कशासाठी दिले असा प्रश्न कामगारांना पडला आहे.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. बसगाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे परिवहन सेवेवरही परिणाम झाला आहे. कंत्राटावरील बसगाड्यांच्या अपघातांची संख्याही वाढत आहे. विद्युत विभागातही काही आलबेल नाही. असे असताना गेल्या आठवड्यात बेस्टला या दोन्ही विभागातील उत्कृष्ट कामगारीसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आले. या कामगिरीमुळे बेस्ट प्रशासनाने आपलीच पाठ थोपटून घेतली आहे. मात्र कामगारांना पगार देण्यासाठी बेस्टला कर्ज घ्यावे लागत आहे, बेस्टवरील कर्जाचा डोंगर वाढत असून संचित तूटही आठ हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. प्रवाशांना बेस्टची सेवाही वेळेवर मिळत नाही अशा परिस्थितीत बेस्टला हे पुरस्कार कशासाठी दिले, असा सवाल बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

वाहतूक विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेस्ट उपक्रमाला ८ मार्च रोजी राष्ट्रीय सार्वजनिक परिवहन उत्कृष्टता पुरस्काराने गौरवण्यात आले. असोशिएशन ऑफ स्टेट रोड ट्रानस्पोर्ट अंडरटेकिंग्ज यांच्या वतीने दिल्ली येथे माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते बेस्टला हा पुरस्कार देण्यात आला. महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संपूर्ण भारतातील शहरी भागात एक हजारपेक्षा जास्त प्रवासी बसगाड्यांची संख्या असलेल्या विविध परिवहन उपक्रमातून बेस्ट उपक्रमाची निवड करण्यात आली.

गेल्या आठवड्यात बेस्टला ऊर्जा संक्रमण – मार्ग प्रकाश विद्युतीकरणमधील शहरी स्थानिक संस्था उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी उर्जा सचिव अनिल राजदान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाते अध्यक्ष अनिल कुमार जैन यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीतील डिझायर हॉल, ले मेरिडियन येथे झालेल्या १३ व्या हरित ऊर्जा शिखर परिषदेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक बिलाल शेख आणि बेस्ट उपक्रमाचे मुख्य अभियंता नियोजन विभागाचे प्रमुख सुरेश. पा. मकवाना यांनी पुरस्कार स्वीकारले. पुरस्कार समारंभ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केला होता.

बेस्टच्या विद्युत व परिवहन या दोन्ही विभागांची सध्या दुर्दशा झाली असून बेस्टला कामगारांचे दरमहा पगार देण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. दिवसेंदिवस बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्या कमी होत आहेत. भविष्यात बेस्ट टिकेल की नाही याची शाश्वती नाही. खासगी कंत्राटदाराच्या बस चालक व वाहकांचे वारंवार संप होत असतात, त्यांच्याकडून अपघात होत असतात. त्यावर बेस्ट प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. तरीही बेस्टला पुरस्कार कसा काय मिळतो हा संशोधनाचा विषय असल्याची टीका कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली.

प्रवाशांना बस थांब्यावर बेस्ट बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. बस वेळेवर येत नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. गाड्यांची संख्या कमी झालेली असताना पुरस्कार मिळणे या गोष्टीबाबत सामंत यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Story img Loader