कराराच्या सादरीकरणाची बेस्ट समितीची मागणी

मुंबई : खुल्या बाजारात स्वस्त दरात मिळणारी वीज खरेदी करण्याचा दावा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला अखेर मुंबईमधील विजेची गरज भागविण्यासाठी टाटा वीज कंपनीकडे धाव घ्यावी लागली आहे. टाटा वीज कंपनीकडून ६७६.६९ मेगाव्ॉट, तर मणीकरण पॉवर आणि त्यांचे विकासक साई वर्धा पॉवर जनरेशनकडून १०० मेगाव्ॉट वीज खरेदी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मात्र या कंपन्यांबरोबर करण्यात येणाऱ्या कराराचे सादरीकरण करण्याचा आग्रह धरत बेस्ट समितीने याबाबतचा प्रस्ताव राखून ठेवला. त्यामुळे वीज खरेदी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

वीजपुरवठय़ाबाबत बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीबरोबर केलेल्या कराराची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपुष्टात आली. दरम्यानच्या काळात खुल्या बाजारात स्वस्त दरात मिळणारी वीज खरेदी करण्याचा दावा बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र खुल्या बाजारातील दरात तफावत निर्माण झाल्याने अखेर बेस्टला टाटा वीज कंपनीकडे वळावे लागले आहे.

निविदा प्रक्रियेअंती बेस्टने १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीसाठी टाटा वीज कंपनी आणि मणीकरण पॉवर – साई वर्धा यांच्याकडून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा वीज कंपनीकडून प्रति युनिट रुपये ६३ पैसे दराने ६७६.६९ मेगाव्ॉट, तर मणीकरण वॉवर-साई वर्धा यांच्याकडून प्रति युनिट तीन रुपये ९४ पैसे दराने १०० मेगाव्ॉट वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने बेस्ट समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केला होता. भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केली. तसेच मणीकरण पॉवर कंपनीने आतापर्यंत कोणत्या राज्यांना वीजपुरवठा केला आहे, या कंपनीचे संचालक कोण आहेत, या कंपनीला कामाचा किती अनुभव आहे, असे अनेक प्रश्न सदस्यांनी या वेळी उपस्थित केले.

लवकर कार्यादेश देण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी द्यावी, अशी विनंती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे करीत होते. मात्र मणीकरण पॉवर आणि साई वर्धा कंपनीबाबतची माहिती आणि टाटा वीज कंपनीबरोबरच्या कराराचे सादरीकरण बेस्ट समितीला द्यावे, त्यानंतरच हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, अशी भूमिका भाजपने घेतली. अखेर अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी या संदर्भातील माहिती आणि सादरीकरण करण्याचे आदेश देत प्रस्ताव राखून ठेवला. त्यामुळे वीज खरेदीचा प्रस्ताव आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.