लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बेस्ट उपक्रमाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८०० कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुंबई महानगरपालिकेने केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून बेस्ट उपक्रमाला दरमहा ६० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर दिवाळीच्या बोनससाठी ८० कोटी राखून ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बेस्टची आर्थिक स्थिती वर्षानुवर्षे बिकट होत असून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महानगरपालिकेकडून बेस्टला आर्थिक मदत करण्यात येते आहे. पायाभूत विकास आणि भांडवली उपकरण खेरदी करणे, दैनंदिन खर्च भागवणे, अल्प मुदतीची कर्जे फेडणे या कामांसाठी महानगरपालिकेतर्फे अनुदान दिले जाते. गेल्या आर्थिक वर्षात बेस्टला ८०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. मात्र त्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी अधिकचा निधी देण्यात आला. प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षात बेस्टला १३८२ कोटी रुपये देण्यात आले होते. तर या वर्षात आणखी ८०० कोटी देण्याची घोषणा मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार एप्रिलपासून हे अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. बेस्टला देण्यात येणाऱ्या ८०० कोटी रुपयांच्या अनुदानातील ८० कोटी रुपये दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. तर उर्वरित ७२० कोटीमधून दरमहा ६० कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला देण्यात येणार आहेत.

आणखी वाचा- मुंबई: माथाडी कामगारांसाठी आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त!

हे अनुदान दर महिन्याच्या सुरुवातीला देण्याबाबतच्या प्रस्तावाला नुसतीच आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे बेस्टचा आर्थिक प्रश्न तात्पुरता तरी सुटणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याची खात्री बाळगता येणार आहे. या अनुदानातून पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी करणे, कर्जाची परतफेड, दैनंदिन खर्च भागवणे, भाडेतत्त्वावरील नवीन बसगाड्या खरेदी करणे, वेतन करारानुसार वेतन देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाच्या रकमेचे अधिदान करणे आदींसाठी यंदा ८०० कोटी रुपयांचा विनियोग करावा, अशी अपेक्षा महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.