मुंबईत दिवसेंदिवस विजेवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टतर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मुंबईतील बेस्टचे विविध ठिकाणचे आगार, तसेच आसपासच्या परिसरात ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याचबरोबर ग्राहकांसाठी मोबाईल ॲपचा पर्याय विकसित करण्याचा बेस्टचा मानस आहे.
बेस्टने सध्या २४ आगारांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग केंद्राच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत दोन ते तीन ठिकाणी चार्जिंग केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. बेस्ट आगारातील चार्जिंग केंद्रांवर बेस्टच्या बसगाड्या, तर अन्य ठिकाणच्या चार्चिंग केंद्रांवर खासगी वाहने चार्ज करता येतील. येत्या काही महिन्यांत मुंबई शहर आणि उपनगरांत १० ते १२ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. बस आगारात ४० किलो वॉट ते ५० किलोवॉटचे चार्जर उपलब्ध करण्यात येणार आहेत. तर खासगी वाहनांसाठी १० ते ११ किलोवॉटचे चार्जर उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबईतील आगारांसाठी १०० मेगावॉट विजेची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
हेही वाचा – मुंबई : अभिनेता सुबोध भावे दिसणार बिरबलाच्या भूमिकेत
हेही वाचा – ‘पीएमएलए’ कायद्यातील आजारी व्यक्तीच्या व्याख्येत मलिक येतात का? उच्च न्यायालयाची विचारणा
या ठिकाणी ई-चार्जिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू
एनसीसीआय, मंत्रालय, म्युझियम, हिरानंदानी बस स्थानक, वाळकेश्वर बस स्थानक, ताडदेव बस स्थानक, कुलाबा, बॅकबे, वांद्रे रेक्लमेंशन, वांद्रे पूर्व बस स्थानक, गोरेगाव बस स्थानक, गोरेगाव पश्चिम बस स्थानक, सेव्हन बंगलो बस स्थानक.