मुंबई : बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्याची बाब बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्याही हाती राहिलेली नाही आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडेही त्याचे उत्तर नाही. त्यामुळे राज्य सरकारने बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य केले आणि भविष्यासाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला तरच बेस्ट जगेल हे वास्तव आहे, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी बेस्टबाबतची वस्तुस्थिती मांडली. तसेच येत्या १० दिवसांत आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असेही आश्वासन राणे यांनी दिले.

बेस्ट उपक्रमाच्या विविध प्रश्नांवर आतापर्यंत कोणताही तोडगा प्रशासकीय पातळीवरून आणि राजकीय पातळीवरून निघालेला नाही. आता या प्रश्नासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. बेस्टशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राणे यांनी गुरुवारी बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांची भेट घेतली. त्यासाठी राणे गुरुवारी कुलाबा येथील बेस्टच्या मुख्यालयात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बेस्टची वस्तुस्थिती मांडली.

राणे यांनी महाव्यवस्थापकांशी कामगारांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच बेस्टच्या सद्यस्थितीविषयीही चर्चा केली. त्यानंतर बेस्टच्या आर्थिक स्थितीबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. बेस्ट ही मुंबईची ओळख असून मुंबईकरांना बेस्टची चांगली सेवा देण्यासाठी तब्बल ८००० गाड्यांची आवश्यकता आहे. मात्र बेस्टकडे सध्या स्वतःच्या साडेसातशे गाड्या आणि भाड्याच्या पाचशे गाड्या आहेत. त्यामुळे ताफा वाढवण्यासाठी व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी, बेस्टला डबघाईतून बाहेर काढण्यासाठी, सेवानिवृत्तांची देणी देण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. जगातील कोणत्याही देशातील सार्वजनिक परिवहन संस्था ही तोट्यातच चालते. सरकारने आर्थिक मदत केल्याशिवाय परिवहन संस्था चालू शकत नाही. त्यामुळे पुढील दहा दिवसांत मुख्यमंत्री वेळ देतील तेव्हा बेस्टला वाचवण्यासाठी बैठक घेऊ, असे आश्वासन राणे यांनी यावेळी दिले. अर्थमंत्री अजित पवार, पालिका आयुक्त भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत ही संयुक्त बैठक आयोजित करून बेस्टसाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असेही आश्वासन राणे यांनी यावेळी दिले.

अनेक वर्षांनी बेस्टमध्ये

नगरसेवक असताना नारायण राणे यांनी तब्बल तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी ते गुरुवारी बेस्ट भवनमध्ये आले. कामगार, कर्मचारी यांनी राणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

युनियनबाजी करायला आलो नाही

राणे यांनी स्थापन केलेली समर्थ बेस्ट कामगार संघटना बेस्ट उपक्रमात असून या संघटनेचे पाच हजार कामगार सदस्य आहेत. या संघटनेच्यावतीने राणे गुरुवारी महाव्यवस्थापकांना भेटायला आले होते. मात्र मी युनियनबाजी करायला आलो नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. खासदार या नात्याने मी मुंबईकर आणि कामगारांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेत असून बेस्ट उपक्रमाला पूर्वीसारखे दिवस दाखवण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करू, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.