महापालिकेप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्याची मागणी करीत कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला असला तरी डळमळीत आर्थिक स्थितीमुळे यंदाही कामगारांना बोनसअभावीच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी महापौर आणि बेस्ट समिती अध्यक्ष सोमवारी महाव्यवस्थापकांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचा अखेरचा प्रयत्न करणार आहेत. मात्र आर्थिक स्थिती सुधारण्यास आणखी तीन वर्षे लागणार असल्याने यंदा बोनस मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.
रस्त्यामध्ये बंद पडणाऱ्या बसगाडय़ा, सुट्टय़ा भागांच्या वाढलेल्या किंमती, डिझेल खरेदीत सरकारकडून मिळणारी सापत्न वागणूक, राजकीय दबावामुळे गेल्या १० वर्षांमध्ये अभावानेच झालेली बस भाडेवाढ, सुधारित वेतनश्रेणी, कर्जाचे हफ्ते आदी विविध कारणांमुळे बेस्टचा परिवहन विभाग तोटय़ाच्या गर्तेत अडकला आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी विद्युतपुरवठा विभागाकडून आर्थिक रसद पुरविण्यात येत आहे. मर्यादित भागातील वीज ग्राहकांकडून मिळणारा पैसा मुंबईच्या कानाकोपऱ्यात तोटय़ात धावणाऱ्या बसगाडय़ांवर खर्च करण्यात येत आहे. त्यामुळेच बेस्ट उपक्रमाने आजघडीला तग धरला आहे. गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतके पैसे बेस्टच्या तिजोरीत नव्हते. त्यामुळे महापालिकेकडून १६०० कोटी रुपये कर्ज बेस्टला घ्यावे लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले आणि त्यावर दिवाळी साजरी करावी लागली, असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षभरात बेस्टच्या आर्थिक स्थितीत फारसा बदल होऊ शकलेला नाही. बस भाडेवाढ आणि वीज दरवाढ करण्यात आली असली तरी भडकलेले डिझेलचे दर, वाढती महागाई, कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात येत असलेली थकबाकी यामुळे बेस्टच्या आर्थिक स्थिती ‘जैसे थेच’ आहे. मात्र प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांमुळे २०१६ पर्यंत बेस्ट उपक्रम तोटय़ातून बाहेर पडेल आणि त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, असा आशावाद या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
मोनो आणि मेट्रो प्रकल्पांचे आव्हान बेस्ट पुढे आहे. मात्र मोनो-मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकांवरुन घरी पोहोचता यावे यासाठी ठिकठिकाणी रिंग बस सेवा सुरू करुन या प्रकल्पांमुळे होणारा तोटा काही अंशी भरुन काढण्याचा बेस्टचा मानस आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.अनेक आव्हानांना तोड देऊन बेस्ट उपक्रमाला तोटय़ातून बाहेर काढावे लागणार आहे. मात्र बेस्टची आर्थिक गाडी रुळावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोनस देणे शक्य होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader