लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट उपक्रमाची ॲप आधारित मुंबई विमानतळ – कफ परेड, खारघर, गुंदवली प्रीमियम बस सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे या बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या बस चलो ॲप कंपनीद्वारे चालवण्यात येत होत्या. त्यांनी या सेवा बंद झाल्याचे जाहीर केले आहे. तसेच याबाबत बेस्ट उपक्रमाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी बेस्टमधील सूत्रांनी ही सेवा बंद झाल्याचे सांगितले.
मुंबईमधील वाढते प्रदूषण ही मोठी समस्या बनली असून, सर्वाधिक प्रदूषण वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होत आहे. तसेच मुंबईत चारचाकी वाहनाची संख्या वाढत असून वाहन संख्या कमी करण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणास अनुकूल वाहतूक सेवा सुरू राहावी यासाठी बेस्ट उपक्रमाने ॲप आधारित प्रीमियम बस सेवा सुरू केली.
आणखी वाचा-ॲन्टॉप हिलमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक
‘चलो मोबाइल’ ॲपद्वारे या बसमधील आसन प्रवाशांना आरक्षित करता येत होते. मुंबई विमानतळ – कफ परेड, खारघर, ठाणे; गुंदवली – मुंबई विमानतळ, बोरिवली – मुंबई विमानतळ अशी प्रीमियम बस सेवा चालवण्यात येत होती. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाभावी या सेवा चालवणे परवडत नसल्याने त्या बंद करण्यात आल्या. दरम्यान, बेस्ट उपक्रमाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.