लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट उपक्रम) परिवहन विभागाची आधीच दुर्दशा झालेली असताना आता विद्युत विभागालाही घरघर लागली आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या रोडावत चालल्यामुळे विद्युत विभागाच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी आठ ते दहा तास लागत आहेत. त्यामुळे यंदा ऐन उन्हाळ्यात मुंबईतील बेस्टच्या विद्युत ग्राहकांची वीज गेल्यास त्यांना दुरुस्तीसाठी वाट पाहात बसावे लागणार आहे.

परिवहन आणि विद्युतपुरवठा असे दोन विभाग असलेल्या बेस्टचा सगळा डोलारा काही वर्षांपर्यंत विद्युत विभागाच्या जिवावर चालत होता. बेस्टचा परिवहन विभाग तोट्यात असला तरी विद्युत विभाग मात्र नफ्यात होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून विद्युत विभागाचीही सेवा ढासळत चालली आहे. विद्युत विभागात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त होत असून पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठीही कर्मचारी नाहीत आणि विजेची बिले भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून देयके स्वीकारण्यासाठीही कर्मचारी नाहीत अशी बेस्टची अवस्था झाली आहे.

बिघाड दुरुस्त करण्यास विलंब

शहर भागात बेस्टच्या विद्युत ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून गिरगाव, भुलेश्वर, नानाचौक परिसरात विजेचा पुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार करण्यासाठी बेस्टने बिलावर जाहीर केलेले संपर्क क्रमांक कधीच कोणी उचलत नाहीत. त्यामुळे तक्रार नोंदवता येत नाही, असा ग्राहकांचा अनुभव आहे.

विद्युतपुरवठा खंडीत झाल्याची तक्रार केल्यानंतर साधारणतः तासाभरात बेस्टचे पथक बिघाड दुरुस्त करण्यास पोहोचते. बेस्टच्या पथकांची व कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे बिघाड दुरुस्त करण्याचा कालावधी दिवसेंदिवस वाढत आहे. बिघाडाबाबतच्या तक्रारींवर बरेच तास कार्यवाही न केल्यामुळे अनेक तक्रारी तशाच ताटकळत असतात, असा ग्राहकांचा अनुभव आहे. विद्युतपुरवठा विभागाकडे पूर्वी मुंबईसाठी २० दुरुस्ती पथके होती. आता केवळ चार ते पाच पथके आहेत. त्यामुळे बिघाड दुरुस्तीसाठी वेळ लागत असल्याची माहिती विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

राजभवनचा विद्युत बिघाड आणि बाकीच्या तक्रारी बाजूला

दक्षिण मुंबईतील नानाचौक भागातील काही निवासी इमारतींमध्ये मंगळवारी दुपारी विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. विद्युतपुरवठा सुरळीत होण्यासाठी तब्बल १२ तास लागले. राजभवनमध्ये विद्युत बिघाड झाल्यामुळे ती तक्रार प्राधान्याने सोडवण्यात आली. त्यामुळे बेस्टकडे आलेल्या तब्बल नऊ ते दहा तक्रारी तशाच ताटकळत होत्या, अशी माहितीबेस्टच्या तक्रार निवारण विभागाकडे चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी दिली.

विद्युत विभागही अडचणीत

दक्षिण मुंबईतील नानाचौक विद्युत विभागही चर्चेत आला आहे. बेस्टचा विद्युत विभाग अद्याप नफ्यात चालत आहे. मात्र या विद्युत विभागातही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. छापील बिले वितरित करण्यासाठी कर्मचारी नाहीत, मीटर वाचनासाठी कर्मचारी नाहीत अशी परिस्थिती असल्यामुळे बेस्टचा विद्युत विभागही सध्या अडचणीत आहे.