सुशांत मोरे

भाडेकपातीनंतर महिनाभरात ३२ टक्क्यांची वाढ; उत्पन्नात मात्र ६५ लाखांची घट

तोटय़ात चाललेल्या उपक्रमाला उभारी देण्यासाठी आणि मुंबईकरांना स्वस्त प्रवासाचा पर्याय देण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने तिकीट दरात ५० टक्क्यांपर्यंतची कपात केल्याला येत्या शुक्रवारी (९ ऑगस्ट) एक महिना पूर्ण होत आहे. या महिनाभरात बेस्टच्या प्रवाशांमध्ये ३२ टक्क्यांची वाढ झाली असून आजघडीला जवळपास २३ लाख मुंबईकर बेस्टच्या बससेवेचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी तिकीटदरांत कपात केल्यामुळे महिनाभरात ६५ लाखांच्या उत्पन्नावर बेस्ट उपक्रमाला पाणी सोडावे लागले आहे.

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताच बेस्ट दर कपातीचा तडाखेबाज निर्णय घेतला. साध्या बसचे पाच किलोमीटरसाठी किमान भाडे पाच रुपये, तर वातानुकूलितचे भाडे सहा रुपये झाले. तर १५ किलोमीटरपुढील साध्या प्रवासासाठीही सरसकट २० रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ जुलैपासून भाडेकपात लागू झाली. सध्या बेस्टचे प्रवासी वाढले असले तरी उत्पन्न कमी झाले आहे. दरकपातीपूर्वीची (८ जुलै) आणि ५ ऑगस्टच्या बेस्टच्या प्रवासी संख्येचा विचार करता ती ५ लाख ६१ हजारांनी वाढली आहे. तुलनेत बेस्टचा महसूल ६५ लाख रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी बेस्टला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भाडेकपात होताच मुलुंड आगारातून विविध मार्गासाठी सुटणाऱ्या बसगाडय़ांना ८४ टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली. त्यानंतर घाटकोपर व देवनार आगार आघाडीवर आहेत. प्रवासी संख्या वाढल्याने बेस्टच्या उत्पन्नातही भर पडेल असा अंदाज आहे.

भाडेकपातीनंतर दीड किलोमीटरसाठी १० ते १५ रुपये आकारणाऱ्या  शेअर रिक्षा व टॅक्सींसाठीच्या रांगा कमी झाल्या व प्रवासी बेस्टकडे वळू लागले. त्यामुळे रात्री दहानंतरही धावणाऱ्या बसगाडय़ांना चांगलीच गर्दी होऊ लागली. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, भाडेकपात होताच मुलुंड आगारातून विविध मार्गावर जाणाऱ्या बसगाडय़ांना सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे. सरासरी ८४ टक्के प्रतिसाद मिळत आहे. त्याखालोखाल घाटकोपर आगाराअंतर्गत बसगाडय़ांना ८१ टक्के आणि देवनार आगारातील बसगाडय़ांना ७५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर गोरेगाव, ओशिवरा, दिंडोशी, पोईसरसह अन्य आगारांतील बसगाडय़ांना ६० ते ७० टक्के प्रतिसाद मिळत आहे.

प्रतीक्षा कायम

बेस्टची प्रवासी संख्या वाढली असली तरी गाडय़ांची व फेऱ्यांची वाढलेली नाही. त्यामुळे अनेक बस स्थानकांवर प्रवाशांना बेस्टकरिता ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्याचा फायदा शेअर रिक्षा व टॅक्सीचालक घेत आहेत. सध्या ३ हजार ३३७ बसगाडय़ा असून त्याच्या दररोज ४७ हजारपेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यामुळे येत्या काही महिन्यांत १६५० मिनी व मिडी बसगाडय़ा ताफ्यात आणण्याचे उद्दिष्ट बेस्टने ठेवले आहे.

या मार्गाना प्रतिसाद

बॅकबे आगार ते सीएसएमटी, मालवणी आगार आणि गायकवाडनगर ते दहिसर बस स्थानक, कांदिवली स्थानक पश्चिम ते बोरिवली स्थानक पश्चिम, प्रबोधनकार ठाकरेनगर बस स्थानक ते कांदरपाडा बस स्थानक, कांदिवली स्थानक पश्चिम ते प्रबोधनकार ठाकरेनगर सेक्टर-८, कांदिवली बस स्थानक पूर्व ते क्रांतीनगर कांदिवली, कुर्ला आगार ते वांद्रे रेल्वे टर्मिनस, कुर्ला आगार ते सांताक्रुझ स्थानक पूर्व, घाटकोपर स्थानक पश्चिम ते आगरकर चौक, मुलुंड स्थानक पश्चिम ते खिंडी पाडा, मुलुंड स्थानक पश्चिम ते वैशालीनगर, मुलुंड, आगरकर चौक ते मजास आगार, कुर्ला स्थानक पूर्व ते टाटा वीज केंद्र.

१७,१५,४४०

८ ऑगस्ट रोजी

बेस्ट प्रवासी संख्या

२२,७६,८३७

सध्याची बेस्ट प्रवासी संख्या

३०.४४ टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्पन्नातील घट