ऑनलाइन प्रवेश : प्रत्येक फेरीत बेटरमेंटचा पर्याय

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ व असंख्य तक्रारी दूर करण्यासाठी पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीत ‘बेटरमेंट’चा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केवळ गुणवत्तेच्याच आधारे प्रवेश दिले जातील. मात्र उपलब्ध जागांमधून पसंतीचे महाविद्यालय निवडण्यासाठी प्रत्येक फेरीत बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर होतील, असे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत गोंधळ असल्याने विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही याबाबत शिवसेना आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालय घराजवळ उपनगरात दूरवरच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना आरक्षण असावे, अशी मागणी विधिमंडळात झाली होती. तर आमदारांनाही महाविद्यालय प्रवेशांमध्ये शिफारशींचा कोटा देण्याची मागणी झाली होती. पण उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे केवळ ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच प्रवेश होतील आणि गुणवत्ता हाच एकमेव निकष राहील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले होते.

पण यंदा विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळविण्यासाठी ‘बेटरमेंट’चा एकच पर्याय उपलब्ध होता. त्यानंतर तो प्रवेशप्रक्रियेबाहेर फेकला जात होता. हे टाळण्यासाठी प्रत्येक फेरीमध्ये उपलब्ध महाविद्यालयांमधील जागांनुसार पसंतीचे महाविद्यालय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

  • अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचा अभ्यास करून ती अधिकाधिक अचूक व निर्दोष करण्यासाठी शिक्षण विभागाने पावले टाकली आहेत.
  • महाविद्यालय स्तरावर एकही प्रवेश दिला जाणार नाही आणि सर्व प्रवेश ऑनलाइनच्या माध्यमातूनच केले जाणार आहेत.
  • बेटरमेंटचे अनेक किंवा अमर्यादित पर्याय उपलब्ध होणार असल्याने पुढील वर्षी विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

 

Story img Loader