रंगमंचावर नाटकांचे सर्वाधिक प्रयोग सादर करीत ‘विक्रमादित्य’ बनलेले सिने-नाटय़ अभिनेते प्रशांत दामले मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नागरी सत्काराच्या बाबतीत भाग्यवंत ठरले आहेत. मात्र गेल्या १३ वर्षांमध्ये नागरी आणि विशेष सत्कारांची घोषणा होऊनही प्रत्यक्ष सत्काराचा मुहूर्त न लाभलेले तब्बल २१ जण सत्काराच्या प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, दृष्टिदाते डॉ. तात्याराव लहाने आणि शिवसेनेचेच मनोहर जोशी आदींचा समावेश आहे. या यादीमध्ये भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचाही समावेश आहे. परंतु त्यांचे निधन झाल्याने हा सत्कार तर आता होणेच शक्य नाही.
रंगमंचावर विविध नाटकांचे १०,७०० प्रयोग सादर करून विक्रम करणारे प्रशांत दामले यांचा महापालिकेतर्फे नागरी सत्कार करण्याचा प्रस्ताव महापौर सुनील प्रभू यांनी गट नेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्यास झटपट मंजुरीही मिळाली. त्यानंतर अवघ्या एक महिन्यातच तातडीने प्रशांत दामले यांची वेळ घेऊन सोमवारी नागरी सत्काराचा सोहळा झाला. गेल्या १३ वर्षांमध्ये इतक्या तत्परतेने नागरी सत्काराचे मानकरी ठरलेले प्रशांत दामले पहिलेच भाग्यवंत ठरले आहेत.
माजी महापौर हरेश्वर पाटील यांच्या हस्ते २००० मध्ये प्रसिद्ध उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी सोमवारी महापालिका सभागृहात नागरी सत्काराची मंगल सनई कानी झडली. गेल्या १३ वर्षांत कर्तृत्व गाजविणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा नागरी अथवा विशेष सत्कार करण्याची घोषणा वेळोवेळी नगरसेवकांकडून करण्यात आली. सभागृहाने त्यावर शिक्कामोर्तबही केले. परंतु हे सत्कार आजतागायत झालेले नाहीत.
या २१ जणांच्या यादीमध्ये मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सतीश भटनागर, डॉ. कोरोमल चंदिरामानी, पहिला ‘इंडियन आयडॉल’ अभिजीत सावंत, मोहन मुणगेकर, विजयपत सिंघानीया, सचिन तेंडुलकर, डॉ. तात्याराव लहाने, अभिनव बिंद्रा, ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर, पं. भीमसेन जोशी, महावीर प्रसाद सराफ आदींचा समावेश आहे.
यापैकी पं. भीमसेन जोशी आणि प्रमोद नवलकर यांचे निधन झाले आहे. तसेच ट्वेटीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत विजयी ठरलेला भारतीय संघ, वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतरही कार्यरत असलेले माजी नगरसेवक, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आलेले मराठी अभिनेते-अभिनेत्री आदींचाही नागरी सत्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली. या दिग्गजांच्या सत्काराला मुहूर्त कधी मिळणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.
दामले यांना महापौरांचे आश्वासन!
महानगर पालिकेकडून दरवर्षी नाटय़गृहाचे भाडे १० टक्क्य़ांनी वाढविले जाणार आहे. त्याचा फेरविचार करून त्यामध्ये सुट मिळावी आणि दादर ते ठाणे या पूर्व उपनगरांमध्ये दोन नाटय़गृहे उभारावीत अशा दोन मागण्या प्रशांत दामले यांनी सत्काराला उत्तर देतानाच्या भाषणात केल्या. त्यावर येत्या दीड वर्षांत नाटय़गृहाच्या कामाला सुरूवात झालेली असेल असे आश्वासन महापौर सुनील प्रभू यांनी दिले.