‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम फेरीचा जल्लोष; नाटय़प्रेमी रसिकांचा उदंड प्रतिसाद
तरुणाईची सर्जनशीलता, कलात्मकता आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडवणाऱ्या, महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी प्रचंड उत्साह आणि उदंड प्रतिसादात पार पडली. मनोरंजनाची आणि संवादाची अत्याधुनिक माध्यमे सतत बदलत असताना नाटकासारखी महाराष्ट्राची पारंपरिक कला आजच्या तरुणांच्या हाती सुरक्षित आहे याचा प्रत्यय ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या अंतिम सोहळय़ात आला. राज्यातील आठ विभागांमधील सवरेत्कृष्ट एकांकिकांच्या झालेल्या उत्कंठावर्धक महाअंतिम लढतीत अखेर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भक्षक ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली. यावेळी स्पर्धकांना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने शनिवारी रवींद्र नाटय़गृहात पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहाय्य लाभले आहे. या स्पध्रेला ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रावर होत आहे. या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून होते. तर ही स्पर्धा पॉवर्ड बाय केसरी आहे.
स्पध्रेत अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते अत्याधुनिक संवादमाध्यम ‘व्हॉट्सअॅप’पर्यंतच्या विषयांचा समावेश होता. राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अहमदनगर या केंद्रांवर पार पडलेल्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये तब्बल १३० एकांकिका सादर झाल्या होत्या. यातील सवरेत्कृष्ट आठ एकांकिका महाअंतिमफेरीत दाखल झाल्या होत्या. वन्यजीव-मानव संघर्षांवर आधारीत औरंगाबादच्या भक्षक एकांकिकेने अंतिम फेरीची सुरुवात झाली. यानंतर अपयशातून यशाचा मार्ग दाखविणारी अहमदनगरची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका सादर झाली. नक्षलवादापेक्षा मानवता ही किती महत्त्वाची आहे हे सांगितले ठाण्याच्या ‘मित्तर’ या एकांकिकेने. तर आधुनिक संवाद माध्यमांमुळे जडणारी नाती आणि बिघडणारा संवाद सादर केला तो नाशिकच्या ‘व्हॉट्सअॅप’ या एकांकिकेने. रत्नागिरीच्या ‘भोग’ या एकांकिकेतून अंधश्रद्धा निमूर्लनावर प्रकाश टाकण्यात आला तर स्त्री सक्षमीकरणाचा पट प्रकाशयोजनेतून वेगळय़ा सादरीकरणाने नागपूरच्या ‘विश्वनटी’ या एकांकिने सर्वाचे लक्ष वेधले. यानंतर मुंबईच्या ‘एक्स-प्रीमेंट’ या एकांकिकेने लुई पाश्चरच्या संशोधनाचा प्रवास दाखविण्यात आला. तर पुण्याच्या ‘जार ऑफ एल्पिस’ या एकांकिकेतून आशावादावर प्रकाशझोत टाकण्यात आला. महाअंतिम फेरीसाठी अभिराम भडकमकर, आनंद इंगळे, राजन भिसे, परेश मोकाशी, प्रतीक्षा लोणकर यांनी परीक्षण केले.
स्पर्धकांचा उत्साह, मान्यवर परीक्षक आणि नाटय़क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. तर या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांची उपस्थितीही तितकीच लक्षणीय होती. एकांकिकांमधील संवादफेक, कसदार अभिनय याला प्रेक्षकांकडून वेळोवेळी दाद मिळत होती. यामुळे नाटय़गृहातील वातावरण नाटय़मय झाले होते. अनोखा नाटय़ाविष्कार पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी एकांकिकांना दाद देऊन नवतरुणांना प्रोत्साहन दिले.
या स्पध्रेत तरुणांच्या सृजनशील शक्तीचे दर्शन घडले. विषयांच्या खोलवर जाण्यासाठी केलेला विचार आणि ते सादर करण्याचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य होता. – शैलेश पेंढारकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा