शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपले टीकास्त्र सोडण्यापूर्वी त्यांनीच कष्टपूर्वक मिळवलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचा सन्मान ठेवायला हवा होता. ज्या नेमाडय़ांनी कायम पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रजांसारख्या साहित्यिकांवर टीका केली. कुसुमाग्रजांना साहित्यिक मानण्यासच नकार देणारे आणि त्याच कुसुमाग्रजांच्या नावाने मिळालेला लाखांचा पुरस्कार खिशात घालणारे नेमाडे हे साहित्यक्षेत्रातील दहशतवादी बनू पाहत आहेत, अशी टीका ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यावरून जो वादंग निर्माण केला गेला आहे त्याला जातीयवादाचा वास येतो आहे, असे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच स्वत:ला इतिहासकार म्हणवून घेतले नाही. त्यांनी शिवशाहीर म्हणूनच सर्वत्र शिवरायांचे गुणगान पोहोचवण्याचे काम केले. मात्र, त्यांचे साहित्य वाचल्यानंतर पुरंदरे स्वत: त्या त्या ठिकाणी फिरले आहेत, त्यांनी संदर्भग्रंथांचा आधार घेऊन प्रत्येक ठिकाणी भेट देऊन मग त्या कथा लिहिल्या आहेत, हे वाचणाऱ्याला सहज ध्यानात येईल. ज्यांनी गेली कित्येक वर्ष संशोधन करून शिवरायांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला त्या बाबासाहेबांना मिळणारा पुरस्कार हा देशाचा सन्मान आहे, असे पाटील यांनी सांगितले. मात्र, केवळ जातिभेदामुळे त्यांच्याविरूध्द द्वेष पसरवला जातो आहे, हे चुकीचे असल्याचे सांगत जातियतेच्या पलिकडे जाऊन विचार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
इतिहासात वादाच्या जागा नेहमीच असतात. इतिहासकार संशोधन करतो, संदर्भ गोळा करतो आणि मग विस्ताराने त्याचे अभ्यासपूर्ण लेखन करतो. याचा अर्थ त्याने जे लिहिले आहे ते सगळे त्याचेच असते, असे अजब तर्कट योग्य नाही. बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्र पटत नाही, असे सांगणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांनी कधीतरी गांभीर्याने शिवाजी महाराजांचा, संभाजींचा अभ्यास केला आहे का, असा सवाल करतानाच ज्यांना इतिहासाच्या नावानेही मिरच्या झोंबतात त्या नेमाडे यांनी छत्रपतींबद्दल बोलणे हाच विनोद असल्याचे सांगितले.
नेमाडेंनी स्वत: अभ्यास करून पुन्हा शिवचरित्र लिहावे. लोकांना ते आवडले तर ते नक्कीच बाबासाहेबांचे शिवचरित्र विसरतील. मात्र, कु ठल्याही प्रकारचा अभ्यास न करता वरच्यावर केलेल्या टीकेला अर्थ नसतो, असे पाटील यांनी सांगितले.
सनदी अधिकारी असल्यामुळे पुरस्कारावरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलता येणार नाही. पण, बाबासाहेबांसारख्या मोठय़ा पुरूषांचा वापर करून महाराष्ट्रात राजकारण के ले जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्तृत्त्वाच्या कमानी उभारता येत नसतील तर द्वेषाचे खड्डे तरी खोदू नका. -विश्वास पाटील

कर्तृत्त्वाच्या कमानी उभारता येत नसतील तर द्वेषाचे खड्डे तरी खोदू नका. -विश्वास पाटील