मुंबई : सरळ सेवा भरती २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीतील एकूण १,०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक – वाहक पदांवर सामावून घेण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

एसटी महामंडळामध्ये २०१९ साली सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात आली होती. या भरतीत निवड झालेल्यांपैकी काही जण गैरहजर होते, तर काही अपात्र ठरले होते. त्यांच्या जागी त्याच भरतीच्या प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांची नेमणूक करण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे. तसेच, प्रतीक्षा यादीतील उर्वरित ७२१ उमेदवारांना आवश्यकतेनुसार रिक्त जागांवर सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>>गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार; नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची तातडीने नेमणूक करण्याच्या सूचना भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या १ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत केली. त्यानुसार संबंधितांची नेमणूक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.