नाटक, चित्रपट, वेब मालिकांबरोबरच मराठी मालिकांमधूनही अभिनेता भरत जाधव यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मात्र, बऱ्याच काळापासून मालिका विश्वापासून लांब असणाऱ्या भरत जाधव यांनी सध्या वाहिन्यांवर टीआरपीचा खेळ सुरु असल्याची खंत व्यक्त केली आहे. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून पुन्हा एकदा भरत जाधव नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: रखडलेल्या झोपु योजनांतील वित्तीय संस्था यापुढे संयुक्त विकासक
झी मराठी वाहिनीवरील ‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ तर कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुखी माणसाचा सदरा’ अशा कित्येक मालिकांमधून त्यांनी काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून चित्रपट आणि मालिका विश्वापासून लांब असलेल्या भरत जाधव यांनी पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करण्यास आवडेल अशी इच्छा व्यक्त केली, मात्र त्याच वेळी वाहिन्यांवर सुरू असलेला ‘टीआरपी’चा खेळ चांगल्या मालिकांच्या मुळावर येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘कोणत्या वाहिनीवर कोणत्या वेळेत कोणत्या विषयांचे कार्यक्रम सुरु आहेत, त्यांचा टीआरपी किती आहे हे पाहण्याच्या नादात वाहिन्यांवर विविध मालिकांमधून चांगला विषय मांडायचा राहतो आणि आपल्या वाहिनीवर त्या वेळेत ठराविक विषयाचा कार्यक्रम सादर करण्याची शर्यत वाहिन्यांमध्ये लागते’, असे भरत जाधव यांनी सांगितले.