नियोजनात ऐनवेळी बदल

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरील अंत्यसंस्कारामुळे शिवाजी पार्कवरच स्मारक उभारण्यावरून वाद सुरू असताना, अंत्यविधीबाबत नवी माहिती समोर आली आह़े 

लताबाईंचे पार्थिव केवळ अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कवर ठेवावे, असे मूळ नियोजनात ठरले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्काराला येणार, असा निरोप आल्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने स्मशानभूमीची जागा अपुरी पडेल, यासाठी शिवाजी पार्कवरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. 

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता तिथेच त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी होऊ लागली आहे. यावर दादरवासीयांमध्ये विरोधाचा सूर उमटू लागला असून, शिवाजी पार्क मैदानाची स्मशानभूमी करू नका, अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत़  या पार्श्वभूमीवर लताबाईंच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्काराचा निर्णय हा नियोजनाचा भाग नसून, आपत्कालीन परिस्थितीत घेतलेला निर्णय होता, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

लताबाईंच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सरकार-प्रशासनाच्या पातळीवर पुढील तयारी सुरू झाली. अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी उसळणार आणि त्या सर्वाना प्रभुकुंजवर जाता येणार नाही हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत चाहत्यांचे लताबाईंवरील प्रेम लक्षात घेऊन त्यांचे पार्थिव अंत्यसंस्काराआधी अंत्यदर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी शिवाजी पार्कची जागा निश्चित करण्यात आली व त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मंत्रालयातून राजशिष्टाचार विभागाने मुंबई महापालिकेला अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्याची व्यवस्था करण्याचा निरोप दिला. महापालिका मुख्यालयातून तो निरोप दादरच्या प्रभाग कार्यालयाला देण्यात आला. त्यानुसार शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी जागेची व्यवस्था करण्याची तयारी महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केली. त्यानंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे नियोजनात बदल करून अंत्यदर्शनाबरोबरच अंत्यसंस्कारही शिवाजी पार्कवरच करण्याचा निर्णय घेण्यात आला़ 

झाले काय? लताबाईंच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन होत़े मात्र, अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे दिल्लीतून जाहीर करण्यात आले. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या निकषांनुसार आवश्यक व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे शिवाजी पार्कवरच तेवढी मोकळी जागा आणि पोलीस बंदोबस्त तैनात होऊ शकतो हे लक्षात घेऊन अंत्यदर्शनानंतर तेथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि प्रशासनाला घ्यावा लागला, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader