राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनी पक्षाच्या मुख्यालयासमोर वेगवेगळे शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी थाटामाटात पदभार स्वीकारला. पक्षाच्या कामगिरीबद्दल नेत्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण असले तरी राज्यात राष्ट्रवादी क्र. १चा पक्ष होईल अशा पद्धतीने यश मिळविण्याचा निर्धार उभय जोडगोळीने व्यक्त केला. जाधव यांनी तर मित्र पक्ष काँग्रेसला टोला मारण्याची संधी सोडली नाही.
उभय नेत्यांनी स्वतंत्रपणे पदभार स्वीकारल्यानंतर दोघेही संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे गेले. पक्षाची भूमिका मांडल्यानंतर पहिल्याच प्रश्नाने जाधव यांची काहीशी अडचण झाली. चिपळूणमध्ये पक्षाच्या विरोधात पॅनेल उभे करण्यात चूक झाली अशी कबुली दिलीत मग अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मुलाचा राजीनामा घेणार का, या प्रश्नावर, आपला पहिलाच दिवस आहे, असे सांगत ‘शुभ बोल नाऱ्या’ या म्हणीची आठवण जाधव यांनी करून दिली. पण पत्रकार या प्रश्नाचा पिच्छा सोडत नसल्याने जाधव गडबडले. हा पक्षाचा अंतर्गत मामला असल्याचे सांगत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
पक्षापुढील आव्हानांपेक्षा लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देणे हे आमचे एकमेव ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. जातीयवादी पक्षांना राज्यात थारा मिळणार नाही अशा पद्धतीने व्यूहरचान केली जाईल, असा इशारा कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे स्वप्न साकार करण्याकरिता सर्व काही केले जाईल, असेही त्यांचे म्हणणे होते.
जातीयवादी पक्षांच्या विरोधात लढण्याची भाषा करता पण राष्ट्रवादीने विदर्भात जातीयवादी पक्षांबरोबर हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे याकडे लक्ष वेधले असता काँग्रेसनेही काही ठिकाणी असाच प्रयोग केला आहे. आपण अजून नवे आहोत. पण माहिती घेतल्यावर काँग्रेसचे उद्योगही उघड करू, असे जाधव यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा