युती तुटल्यानंतर भाजपाने शिवसेनेला वारंवार निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यावरून टीका केलीय. आताही या मुद्द्यावरून टीका होत असते. त्यावर शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “आजही भाजपा आणि त्या गद्दारांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. मात्र, आमच्या एकाही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नाही,” असं म्हणत भास्कर जाधवांनी टोला लगावला. ते बुधवारी (२१ सप्टेंबर) मुंबईतील नेस्को सभागृहात आयोजित गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, “१९८९ पासून युतीमध्ये आणि त्याआधी १९६६ पासून आजपर्यंत शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याचं काम तुम्ही केलं. आजही भाजपा आणि त्या गद्दारांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. मात्र, आमच्या एकाही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नाही.”
“बाळासाहेबांच्या फोटोमुळेच भाजपाला हे सत्तेचे दिवस पाहायला मिळत आहेत,” असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपाला टोला लगावला.
“काही लोकांचा मुंबईवर फार फार वर्षांपासून डोळा”
भास्कर जाधव पुढे म्हणाले, “एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी आमचा प्रयत्न आहे. ते आमचं फार फार जुनं स्वप्न आहे. याचा अर्थ ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी आपल्या १०६ लोकांनी हौताम्य पत्करलं होतं. त्याच मुंबईवर फार फार वर्षांपासून काही लोकांचा डोळा आहे.”
“देशाच्या आर्थिक राजधानीवर शिवसेनेचाच भगव झेंडा फडकवणार”
“आपण मुंबई महानगरपालिकेची सत्ता जनतेची सेवा करण्यासाठी मागतो, मात्र काही लोक त्यांची हव्यास, हाव आणि अनेक वर्षांचा हेतू साध्य करण्यासाठी महानगरपालिकेची सत्ता मागत आहेत. त्यामुळे गटप्रमुखांना आज निश्चय करायचा आहे की, १०६ जणांच्या हौताम्यासह निर्माण झालेला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या राजधानीवर, देशाच्या आर्थिक राजधानीवर शिवसेनेचाच भगव झेंडा फडकवणार आहे,” असंही भास्कर जाधव यांनी नमूद केलं.