राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. आता शेतकऱ्यांबाबत अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं असंवेदनशील वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. त्यांच्या विधानानंतर तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनीही सत्तार यांच्यावर टीकास्र डागलं आहे.

“अब्दुल सत्तार अशाच पद्धतीने बेताल वक्तव्य करतात. शेतकऱ्यांबाबत त्यांना प्रेम, आत्मीयता, सहानभुती आणि काळजी नाही. स्वत:च्या कामाने महाराष्ट्रात नावारूपाला येणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे कधी महिलांबद्दल अश्लाघ्य बोलतात, शेतकऱ्यांबाबत बोलतात, अधिकाऱ्यांना दारू पिता का म्हणून विचारतात,” असा समाचार विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी घेतला आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांनी समोर आणली मोठी चूक; म्हणाले, “आता…”

“शेतकऱ्यांवर एवढं मोठं संकट आलं आहे. अवकाळी पाऊस पडल्यानंतर अब्दुल सत्तार कुठं बांधावर दिसले का? म्हणून वायफळ बडबड, शेतकऱ्यांची टिंगळटवाळी करणं, जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग अब्दुल सत्तार नेहमी करतात. त्याला मुख्यमंत्री आवर घालत नाही. त्यामुळे त्यांची बेताल वक्तव्य दिवसेंदिवस वाढत चालली आहेत,” अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हेही वाचा : “आम्हाला पंचामृत दिलं, एकनाथ शिंदेंना प्रसाद अन् भाजपाला…”, अर्थसंकल्पावरून अजित पवारांची फडणवीसांसमोर टोलेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर भाष्य केलं आहे. “अब्दुल सत्तार आणि राज्य सरकार हे असंवेदनशील आहे. कृषीमंत्र्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला असून शेतकऱ्यांच्याबाबत त्यांची भाषा ही दिलासादायक नाही.”

Story img Loader