शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर सडकून टीका केलीय. भाजपाने संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं. त्यातून आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये भाजपाबद्दल असंतोष असल्याचं मत भास्कर जाधव व्यक्त केलं. तसेच भाजपाच्या हवेत उडणाऱ्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल, असं म्हणत भाजपाला खोचक टोला लगावला. ते शुक्रवारी (१० जून) मुंबईत विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले, “भाजपाने खूप मोठं संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं. परंतु आता एकदंर जे चित्र दिसतं आहे त्यातून आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये भाजपाबद्दल असंतोष आहे. तो असंतोष संध्याकाळी मतमोजणीच्या निमित्ताने स्पष्ट होईल.”

“भाजपाच्या हवेत उडणाऱ्या या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल”

“२० तारखेची निवडणूक सुद्धा भाजपाने आपल्या मतांच्या कोट्यापेक्षा अधिक उमेदवार उभे करून महाविकासआघाडीत खूप मोठा असंतोष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. भाजपाच्या हवेत उडणाऱ्या या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल,” असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला.

“एमआयएम मविआची ‘बी टीम'”; भाजपाच्या टीकेवर भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर

“भाजपाच्या बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलंय. त्यामुळे भाजपा कोणाबद्दल काहीही बोलली तरी त्यांच्या शब्दाबद्दल विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे भाजपा काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच, ही भाजपाची सवय”, भास्कर जाधव यांचं टीकास्त्र

भाजपाने महाविकास आघाडीचा एक संजय घरी जाणार अशी टीका केली. यावर भास्कर जाधव यांनी भाजपाचे लोक काहीही वक्तव्य करत असतात. परंतु संध्याकाळी पाच वाजता वस्तूस्थिती काय हे सर्वांच्या डोळ्यासमोर येईल, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.