दादरमध्ये गणेशोत्सवादरम्यान झालेल्या गोळीबाराप्रकरणी आज पोलिसांनी अहवाल सादर केला. या अहवालात सदा सरवणकर यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. दादर पोलीस ठाण्याबाहेर झालेला गोळीबार हा सदा सरवणकर यांनी केला नसल्याचे पोलिसांनी या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, सरवणकरांना मिळालेल्या क्लीनचिटनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना-भाजपा सरकारवर टीकास्र सोडलं. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…भाऊ, म्हणून माझं तुमच्यावर लक्ष असतं”; एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टीप्पणी

काय म्हणाले भास्कर जाधव?

“सदा सरवणकर यांनी तीन महिन्यांपूर्वी स्वत: रिवॉल्वरमधून गोळी झाडली होती, असा अहवाल आला होता. आता तीन महिन्यांनंतर त्यांना याप्रकरणी क्लीनचीट दिली आहे. यात विशेष असं काहीही नाही. यापूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांची ईडीने आणि सीबीआयने चौकशी केली, ते लोक भाजपात गेल्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळत गेली. त्यामुळे सदा सरवणकर हे भाजपाच्या सरकारमधले एक घटक पक्ष आहे. त्यामुळे त्यांना क्लीनचिट मिळायलाच पाहिजे होती. हे सर्व भाजपाच्या धोरणांनुसारच घडलं आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

“सरवणकरांना क्लीनचिट मिळाली, यात विशेष नाही”

“फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट मिळाली. तसेच १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केल्यानंतर परमवीर सिंग यांच्यावर कोणताही कारवाई झाली नाही. खरं तर कोणालाही आपल्यावरील आरोपांमधून सुटका करून घ्यायची असेल त्यांनी भाजपामध्ये जावं किंवा भाजपाला समर्थन तरी द्यावं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सदा सरवणकरांना क्लीनचिट मिळाली, यात आश्चर्यकारक काहीही नाही”, असेही ते म्हणाले.

“मग तेव्हा भाजपाचा राष्ट्रभक्ती कुठं जाते?”

पुढे बोलताना त्यांनी नवाब मलिक यांच्यावरील कारवाईवरूनही भाजपावर टीकास्र सोडलं. “नवाब मलिक यांना भाजपा संशयाच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांना देशद्रोही ठरवते आणि आता शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे यांनी एक तासाच्या मुलाखतीत स्वत: दाऊद इब्राहीमशी संबंधित महिलेला आर्थिक मदत दिल्याची कबुली दिली आहे. मग तेव्हा भाजपाचा राष्ट्रभक्ती कुठं जाते?” असेही ते म्हणाले.

हेही वाचा – किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब आक्रमक; विधान परिषदेत मांडला थेट हक्कभंग प्रस्ताव; म्हणाले…

उर्फी जावेद प्रकरणावरूनही चित्रा वाघ यांना टोला

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी उर्फी जावेद प्रकरणावरूनही चित्रा वाघ यांना नाव न घेता टोला लगावला. “आता उर्फी जावेदच्या कपड्यावर बोललं जात नाही, ती भाजपात गेली की काय? असे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav criticized bjp on sada sarvankar clean chit in mumbai firing case spb