Maharashtra Assembly Monsoon Session : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर काल झालेल्या धक्काबुक्कीनंतर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील आमदारांनी बॅनरबाजी करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचं शक्तीस्थळ म्हणून आदित्य ठाकरेंचा उदय होतो आहे, हे भाजपाच्या लक्षात आल्यानेच भाजपाकडून आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात असल्याचं ते म्हणाले.
काय म्हणाले भास्कर जाधव?
”पन्नास खोक्यांची घोषणा त्यांच्या वर्मावर बसली आहे. पन्नास खोक्यांचा बाण एकदम योग्य ठिकाणी बसला आहे. आज शाळेतली मुलं, सर्वसामान्य माणसंही आता ‘पन्नास खोके एकमद ओके’ म्हणायला लागले आहेत. त्या अस्वस्थतेतून शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
”आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला जो प्रतिसाद मिळतो आहे, हे बघून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जर आदित्य ठाकरेंना एवढा प्रतिसाद मिळत असेल, तर उद्धव ठाकरेंना किती प्रतिसाद मिळेल, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली असल्याने, त्यांनी ठाकरे परिवारावर टीका करणं सुरू केली आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – राज ठाकरे परवा मुंबईत बोलले आणि मनसे कार्यकर्त्यांनी आज ‘करुन दाखवले’; पुण्यात ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा
”नेहमी विरोधीगटाच्या शक्तीस्थळावर आघात केला जातो. आदित्य ठाकरेंना जो प्रतिसाद मिळतो आहे, हे पाहून शिवसेनेचं शक्तीस्थळ म्हणून आदित्य ठाकरेंचा उदय होतो आहे, हे भाजपाच्या लक्षात आल्यानेच भाजपाकडून आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात आहे. भाजपाच्या टीकेमुळे आदित्य ठाकरे किती मोठे आणि मजबूत नेते बनत आहेत, हे समजते, असा टोलाही त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लगावला.