मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली.
शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल. काही पदाधिकारी दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही, असता त्यांचा समज झालेला आहे. मी कुठल्यातरी नेत्याची मर्जी सांभाळली की, माझे पद शाबूत. त्यांना पदावरून बाजूला करण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही. ते नाराज होऊ नये म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. पूर्वी पक्षाचा कार्यक्रम असला की शाखाप्रमुखाच्या अंगात अंगार संचारायचा, आज शाखाप्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठे आहेत, याचा आढावा घ्यायला लागेल, असे भास्कर जाधव म्हणाले.
हेही वाचा >>> प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वेवर लोहमार्ग पोलीस ठाणे उभे राहणार, रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात १४० पोलिसांचा ताफा
शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करा, असा सल्ला भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना दिला आहे. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्या नावाने फर्मान काढावे लागतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, अशी नाराजीनही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> सागरी किनारा मार्गावरील भरधाव गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेणार
राऊत यांचा सबुरीचा सल्ला
भास्कर जाधव यांना शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सबुरीचा सल्ला दिला. भास्कर जाधव आमचे सहकारी आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन. पण संघर्षाच्या आणि कठीण काळातून पक्ष जात असताना, अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केले पाहिजे, अशी आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असे नाही. शिवसेनाप्रमुखांनी घेतलेल्या भूमिकांवरही मतभेद झालेले आहेत. तरीही बाळसाहेबांनी हा पक्ष ताकदीने पुढे नेला आणि आम्ही सर्व त्यांच्या प्रवासातील सहकारी आहोत, असे ते म्हणाले.
जाधव यांना शिंदे गटाचे निमंत्रण भास्कर जाधव यांनी असे विधान करताच शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना थेट पक्षात येण्याचा प्रस्ताव देण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जे भास्कर जाधव आता बोलले ते आम्ही अडीच वर्षांपूर्वी केले. आता त्यांची घुसमट का होत आहे? ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची, अनुभवाची आम्हाला गरज आहे. भास्कर जाधवांना पक्षात घ्यायचे की नाही हा निर्णय शिंदे घेतील, पण मोठे नेते आहेत, आमच्या पक्षात आले तर आवडेल, असे विधान सामंत यांनी केले.