रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांना गुहागर नगरपंचायत निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. भास्कर जाधव स्वत: गुहागरमधून आमदार आहेत. पण गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली. शिवसेनेलाही फक्त एकच जागा मिळाली आहे पण शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे नगरपंचायतीत शिवसेनेच्या पाठिंब्याने शहर विकास आघाडीची सत्ता येणार आहे.
शिवसेनेने भास्कर जाधव यांच्यावर नाराज असलेल्यांना एकत्र करुन त्यांची मोट बांधली. याच शहर विकास आघाडीने भास्कर जाधव यांना धक्का दिला. भास्कर जाधव हे आधी शिवसेनेमध्ये होते पण शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात विविध मंत्रिपदे भूषवणारे जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते.
भास्कर जाधव आधी चिपळूणचे आमदार होते. मतदारसंघ फेररचनेनंतर ते गृहागरमधून विधानसभेवर गेले. त्यांच्याच कार्यकाळात गुहागर नगरपंचायत अस्तित्वात आली पण आता त्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव झाला आहे. या नगरपंचायतीत भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला आहे.