शिंदे गटात सहभागी होण्यासाठी भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना जवळपास १०० फोन केले होते, असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला होता. कंबोज यांच्या या दावानंतर भास्कर जाधवांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर केलेले आरोप कंबोज यांनी सिद्ध केल्यास मी राजकीय जीवनातून मुक्त होईल, असे ते म्हणाले. विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिंदे गटाने बजावलेल्या व्हीपचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे गटाचे वकील म्हणाले, “आपण बोलत असतानाही तिकडे…”

काय म्हणाले भास्कर जाधव?

“मोहित कंबोज हा फडतूस माणूस आहे. त्याने माझ्यावर केलेला एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. भाजपाकडे भरमसाठ पैसा आहे. तपास यंत्रणा आहेत आणि सत्तेची मस्तीही आहे. मात्र, मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरिता लढतो. तुमच्याकडे असलेल्या तपास यंत्रणा माझ्या मागे लावा, १०० सोडा, जर मी एकनाथ शिंदेंना पाच फोन जरी केले असतील, तर राजकीय जीवनातून मुक्त होईन”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

हेही वाचा – SC Hearing on Maharashtra Political Crisis Live: “राज्यपालांनी अजून काय करायला हवं होतं? त्यांच्यासमोर…”, सर्वोच्च न्यायालयात नीरज कौल यांचा युक्तिवाद!

“मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे, त्या अनाजीपंतांनाही मी सांगतो, तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती संपवायला निघाला आहात. पण माझ्यासारखे १०० भास्कर जाधव उभे राहतील. माझ्यावर खोटे आरोप करून तुम्ही माझी कारकीर्द संपवू शकत नाही. कंबोजसारख्या फडतूस माणसाने आरोप केल्यानंतर माझी नाही, तर अनाजीपंतांची प्रतिमा डागाळली जात आहे”, असेही ते म्हणाले.

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले होते?

कंबोज यांनी सोमवारी एक व्हिडीओ ट्वीट करत भास्कर जाधवांवर गंभीर आरोप केले होते. “खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे! ही म्हण आज भास्कर जाधवांना लागू होते. गेल्यावर्षी जून २०२२ मध्ये भास्कर जाधव यांनी शिंदे किमान १०० वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून वेगळा झाला होता. आज हाच गट शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी शिंदे गटात सामील होण्याचं निवेदन दिलं होतं.”

“पण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार भास्कर जाधवांना आपल्या समवेत घेण्यास राजी नव्हते. कारण प्रत्येकाला वाटत होतं, की भास्कर जाधवांवर विश्वास ठेवू शकत नाही. आज भास्कर जाधव जेवढी बडबड करत आहेत. पण त्यावेळी ते तिकीट काढून गुवाहाटीला येण्यास निघाले होते. जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या गटात घेणार नाहीत, तोपर्यंत मी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनच्या बाहेर बसणार, असं भास्कर जाधव म्हणत होते. त्यांच्याबरोबर दुसरे नेते सुनील राऊतही होते,” असा दावा कंबोज यांनी केला होता

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav replied to mohit kamboj allegation releted to join shinde group spb
Show comments