खासदारांची संख्या वाढविण्याकरिता काही मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे राष्ट्रवादीने सूचित केले असतानाच रायगड मतदारसंघातून लढण्याची तयारी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दर्शविली आहे. रायगड मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, असा पक्षाचा आग्रह आहे.
लागोपाठ तीन लोकसभा निवडणुकीत राज्यातून राष्ट्रवादीला खासदारांचा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र संख्याबळ वाढविण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. केंद्रात सत्ता स्थापनेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे महत्त्व वाढले पाहिजे यासाठी सारा खटाटोप सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीत स्वत: शरद पवार यांनी लक्ष घातले असून, प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. आघाडीत काही मतदारसंघांची अदलाबदल व्हावी, असा दोन्ही काँग्रेस नेत्यांचा प्रस्ताव आहे. यातूनच कोणते मतदारसंघ कोणाकडे जाऊ शकतात, या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. रायगड हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असून काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येण्याची चिन्हे नसल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा आहे. या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
सुनील तटकरे यांची लोकसभा लढण्याची इच्छा नाही.त्यामुळे, या मतदारसंघातून लढण्याची तयारी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दर्शविली आहे. पक्षाने संधी दिल्यास विजयाची पक्की खात्री असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसची द्विधा स्थिती
रायगडमधून उमेदवार निवडून येण्याची काँग्रेसला फारशी आशा नाही. मात्र पक्षाला राज्यातून एक तरी मुस्लिम उमेदवार उभा करावा लागतो. या दृष्टीने रायगड मतदारसंघ फायदेशीर असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.