पुरातन वस्तूंचे आकर्षण प्रत्येकालाच असते. एखादी वास्तू, भांडी-कुंडी, शिल्पे, चित्र, पुतळे, शस्त्रास्त्रे, दस्तावेज, वस्तू यांच्यावर पुरातन हा शिक्का बसला की ती न्याहाळायला सर्वानाच आवडते. अनेक छंदिष्ट लोक या पुरातन वस्तूंचा संग्रह करतात, जेणेकरून नव्या पिढीला या वस्तू पाहता येतील, तर सरकार व प्रशासनही अनेक शहरांमध्ये वस्तुसंग्रहालय उभारून पुरातन वस्तूंच्या संग्रहाला चालना देते. भारतातील तिसरे आणि मुंबईतील पहिले वस्तुसंग्रहालय असलेले ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’ हे त्यापैकीच एक.
या वस्तुसंग्रहालयाची निर्मिती केली ती इंग्रज सरकारने. राणी व्हिक्टोरिया अँड प्रिन्स अल्बर्ट म्युझियम असे त्याचे जुने नाव. राणी व्हिक्टोरियाला ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ हा किताब बहाल करण्यात आल्याने इंग्रज सरकारने देणगी आणि लोकवर्गणीतून या संग्रहालयाची निर्मिती केली. भायखळा रेल्वे स्थानकापासून १० ते १५ मिनिटे अंतरावर असलेल्या ‘राणीच्या बागे’च्या प्रवेशद्वाराजवळच हे वस्तुसंग्रहालय आहे. ही इमारत पाहिल्यानंतर तिची भव्यता आणि कलात्मकता जाणवते. इटालियन रेनेसॉन्स पद्धतीचे या इमारतीचे बांधकाम आहे. ही वास्तु उभारण्यासाठी इतिहास अभ्यासक भाऊ दाजी लाड यांनी अविरत परिश्रम घेतले होते, म्हणून १९७५मध्ये या वस्तुसंग्रहालयाला भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले.
या इमारतीच्या बाजूला काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पुतळे आहे, त्याशिवाय एक भलामोठा दगड हत्ती आणि तोफ आहे. घारापुरी लेणी समूहातील हा हत्ती असल्याचे सांगितले जाते. या दगडी हत्ती आणि तोफेसमोर छायाचित्र काढण्याचा मोह आवरता येत नाही. काही पायऱ्या चढून आतमध्ये प्रवेश केल्यास एका भव्य राजवाडय़ात आल्याचा भास होतो. आतमध्ये तीन मोठी प्रवेशद्वारे आहेत. आतमधील दालनातील खांब आणि भिंतीवरील कोरीवकाम आणि नक्षीकाम नजरेस भरते. अगदी सोन्याचा मुलामा दिल्यासारख्या या भिंती वाटतात. डोक्यावरील रंगीत छप्पर, त्याची रचना आणि नक्षीकाम पाहून हरखूनच जातो. प्रत्येक पुरातन वस्तूवर सोडलेला प्रकाशझोत आणि दिव्यांची केलेली विशिष्ट रचना विलोभनीय वाटते.
आतमध्ये समोरच अल्बर्ट प्रिन्स कॉन्सर्ट आणि डेव्हिड ससून यांचे पुतळे लक्ष वेधून घेतात. काचेच्या चौकटीमध्ये आकर्षक मांडणी करून ठेवलेल्या वस्तू सुबक वाटतात. त्याचसोबत समोरच प्रत्येक वस्तूची माहिती देणारे माहितीपत्रक असल्याने वस्तूचे ऐतिहासिक महत्त्व समजते. म्हैस व गवा यांच्या शिंगापासून बनवलेल्या वस्तू, आकर्षक नक्षीकाम केलेली माती व धातूची भांडी, हस्तिदंत, शंख-शिंपले, लाकूड यांवर केलेली कलाकुसर, विविध धातूंपासून बनवलेल्या मूर्ती आणि चित्रे आदी या वास्तुसंग्रहालयाच्या तळमजल्यावरील दालनात पाहायला मिळते.
तळमजल्याच्या उजव्या अंगाला एक लहानसे सभागृह आहे. तिथे काही चित्रकृती आहेत, त्याशिवाय वस्तुसंग्रहालयाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे मार्गदर्शन केले जाते. तेथूनच पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना लागतो. या जिन्यावर असलेल्या दालनात या वस्तुसंग्रहालयाशी संबंधित मान्यवरांची मोठी तैलचित्रे आहेत. त्यामध्ये जमशेठजी जीजीभॉय, भाऊ दाजी लाड, नाना शंकरशेठ यांच्यासह काही इंग्रज अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पहिल्या मजल्यावरील दालनात मुंबईतील लोकजीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. बलुतेदार, विविध जाती-धर्माचे लोक, त्यांचे पोषाख, व्यवसाय, संस्कृती यांची माहिती या दालनात मिळते. मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या विविध जाती-धर्माच्या लोकांचे पारंपरिक पोषाखातील अर्धपुतळे लक्ष वेधून घेतात. जहाज व्यावसायाची स्थित्यंतरे, पारशी समाजजीवन, पारंपरिक क्रीडाप्रकार, शस्त्रास्त्रे, चिलखतधारी योद्धा, अनेक वाद्य्ो, नृत्यप्रकार याची झलक या दालनात पाहायला मिळते. एकूण मुंबईचे सामाजिक, सांस्कृतिक व औद्योगिक इतिहास या कलादालनामुळे डोळय़ासमोर झळकतो. कमलनयन बजाज कलादालनामध्ये कपडय़ावरील अप्रतिम कलाकुसार पाहायला मिळते.
संग्रहालय हे इतिहास जपण्याची आणि ओळख टिकविण्याची हक्काची जागा असते. भायखळा येथील भाऊ दाजी लाड या वस्तुसंग्रहालयाने इतिहासाचा हा अमूल्य ठेवाच जतन केलेला आहे.
कसे जाल?
- मध्य रेल्वेवरील भायखळा स्थानकापासून चालत १० ते १५ मिनिटे अंतरावर जीजामाता उद्यान आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच हे वस्तुसंग्रहालय आहे.
- भायखळा स्थानकाबाहेरून टॅक्सीनेही येथे जाता येते.