मुंबई : घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलक कोसळण्याची घटना ही नियती होती, असा अजब दावा करून या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी आपल्याविरोधात कऱण्यात आलेले आरोप हे निरर्थक आणि बेकायदेशीर आहेत, असा दावा करून गुन्हा रद्द करण्याची मागणीही त्याने केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी तातडीची सुनावणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची १२०० कोटींची फसवणूक; विदेशी कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

घटनेच्या दिवशी म्हणजेच १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह धुळीचे वादळ येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यास भारतीय हवामान विभाग अपयशी ठरला. त्या दिवशी अनपेक्षितरीत्या ताशी ९६ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे महाकाय जाहिरात फलक कोसळला आणि त्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातही बांधकामातील निष्काळजीपणामुळे फलक कोसळल्याचे नमूद केलेले नाही. त्यामुळे, तो महाकाय जाहिरात फलक कोसळणे ही नियती होती व त्यासाठी आपल्याला किंवा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी धरता येणार नाही, असा दावा भिंडे याने याचिकेत केला आहे. दुर्घटनाग्रस्त फलकासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) घेण्यात आले होते. त्यामुळे, तो फलक बेकायदा उभा करण्यात आला होता असे म्हणता येणार नाही. किंबहुना, रेल्वे पोलिसांच्या परवानगीने अधिकृतरीत्या तो उभा करण्यात आला होता. रेल्वेच्या जागेवर फलक उभे करण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे, ती घेण्यात आली नाही. त्याचप्रमाणे, आपल्याविरोधात राजकीय दबावापोटी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो निराधार आणि चुकीचा आहे, असे दावेही भिंडे याने जामिनाची व गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavesh bhinde claim hoarding collapse an act of god for bail in bombay hc mumbai print news zws