वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना मीरा रोड येथे घडली आहे. एका नगरसेविकेच्या भावाने ही मारहाण केली आहे. या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भाविक पाटील यांनी याबाबतदिलेल्या माहितीनुसार, ते राज्यस्तरीय मराठी दैनिकाचे मीरा भाईंदरचे वार्ताहर आहेत. मीरा रोड येथील पेणकर पाडा परिसरात बनावट परवाने बनवले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. याबाबतचे वृत्त संकलन करण्यासाठी ते गेले होते. यावेळी स्थानिक नगरसेविका अनिता पाटील यांचा भाऊ राजेश चौहान हा भरधाव वेगाने चारचाकी वाहन घेऊन त्यांच्या दिशने आला. त्यामुळे भाविक यांनी वाहन सावकाश घ्या आणि आपण गाडी मागे घेत असल्याचे त्यांना संगितले. मात्र चौहान यांनी गाडीमधून उतरून थेट त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
भाविक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारी नुसार ते गेल्या अनेक महिन्यापासून पेणकर पाडा येथील अनधिकृत विषय वृत्तपत्रात मांडत आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा राग काढण्याकरिता चौहान यांनी हा अनपेक्षित हल्ला केल्याचे म्हटले आहे. तर भाविक यांनी दिलेल्या तक्रारी नुसार मारहाण व पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केल्याची माहिती काशी मिरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. पत्रकार सरंक्षण कायद्याअंतर्गत दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.