भाईंदर पूर्व भागातील गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रात एका महिलेचे लैगिक शोषण करण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन महिन्यानंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या अंतर्गत नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये, म्हणून रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना कोविड विलगीकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर या नागरिकांची करोनाचाचणी करण्यात येते.

दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिच्या बहिणीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला आणि तिच्या परिवाराला २४ मे रोजी कोविड विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान बहिणीचा मृत्यू झाल्याने आणि इतर सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र भाचीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असल्याने ही महिला काही दिवस भाचीसाठी कोविड विलगीकरण केंद्रात राहत होती. या काळात कोविड केंद्रातील सुरक्षा रक्षकाने महिलेच्या बाळाला आणि भाचीला दुधात गुंगीचे औषधं टाकून दिले. त्यानंतर काही काळाने तोच सुरक्षा रक्षक पाणी देण्याच्या कारणामुळे खोलीत आला व आपले लैगिक शोषण केले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

तसेच, या संदर्भात कोणालाही काही सांगितले तर तिच्या बाळाला जीवे मारण्याची तसेच नातेवाईकांना कोविड रुग्णालयात दाखल करण्याची धमकी त्याने दिली होती. असे देखील पीडित महिलेने म्हटले आहे. या प्रकरणात नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhayander shocking type of rape on a woman in a separation center revealed msr