वांगणी रेल्वेस्थानकाजवळील पॉवरहाऊसजवळ आज (गुरुवार) सकाळी १० च्या सुमारास भेकराचे पिल्लू सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वांगणीतील रहिवासी शरिफ बुबेरे आणि चंद्रकांत जाधव यांना पॉवरहाऊसजवळील झुडपात एक वेगळ्याप्रकारचा प्राणी असल्याचे जाणवले. त्यांनी झुडपाजवळ जाऊन पाहिले असता तो कुत्रा किंवा वासरू नसून हरिण सदृश्य प्राणी जखमी अवस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरीत या प्राण्याला वांगणी पोलिस चौकीत नेले. दरम्यान वांगणीत हरिणाचे पिल्लू सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि या पिल्लाला पाहण्यासाठी नागरिकांनी पोलिस चौकीबाहेर तोबा गर्दी केली होती. मात्र त्यानंतर हे हरिणाचे पिल्लू नसून भेकर असल्याचे स्पष्ट झाले. हे भेकर कडवपाडा येथील हनुमान मंदिर परिसराच्या जंगलातील असून कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे ते स्टेशन परिसरात आले असावे असे वनरक्षक यु.एस.मोरे आणि वनपाल एस.ए.आर्डेकर यांनी सांगितले. या भेकरावर वैद्यकीय उपचार करून त्याला जंगलात सोडण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली. वांगणीलगतच्या जंगलात पूर्वी हरिण, भेकर, कोल्ह, ससे, मोर असे अनेक प्राणी होते. मात्र काळाच्या ओघात हे प्राणी नामशेष झाले. मात्र आता अचानकपणे भेकर सापडल्याने कुतुहल व्यक्त होत आहे. ही प्राणीसंपदा जपली पाहिजे असा सूरही आता वांगणीकरांमधून उमटू लागलाय.
(छाया – दीपक जोशी) 

Story img Loader