गेली ५६ वर्षे दरवर्षी ६ डिसेंबर रोजी दादरच्या चौपाटीवर अथांग सागराप्रमाणेच अथांग जनसागरही वाहत आला आहे. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक जवळच्याच इंदू मिलमध्ये होणार ही घोषणा झाल्यानंतर दरवर्षीच्या या उत्साहाला यंदा अलोट भरते आले. चैत्यभूमीवर गुरुवारी अक्षरश: विक्रमी जनसागर लोटला. बाबासाहेबांच्या समाधीसमोर डोके टेकून त्यांना आदरांजली वाहायची आणि मग तडक त्यांच्या नियोजित स्मारकाचे स्थान अर्थात इंदू मिलचे प्रांगण गाठायचे, असा नवा पायंडा आंबेडकरभक्तांनी घातला. देशाच्या कानाकोपऱ्यातून  चैत्यभूमीवर आलेल्या प्रत्येक गटामध्ये चर्चा होती ती फक्त इंदू मिलमधील नियोजित स्मारकाचीच!
महापरिनिर्वाणदिनी दरवर्षी लाखो आंबेडकरभक्त दादरला येतात. पण यावर्षी गर्दीमध्ये विक्रमी वाढ झाल्याचे जाणवत होते. यंदाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे नेहमीच्या तुलनेत ५ डिसेंबरला फारशी गर्दी नव्हती. आणि आज, ६ डिसेंबरला मात्र नेहमीच्या तुलनेत खूप अधिक गर्दी झाली. बुधवारी संसदेमध्ये इंदू मिलची जागा स्मारकासाठी देण्याची घोषणा झाल्यानंतर लोकांची गर्दी वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
आम्ही फक्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतो. आमचा एकच नेता आणि एकच साहेब ‘बाबासाहेब’ अशा शब्दांत लहानू दाभाडे यांनी दरवर्षी चैत्यभूमीवर येण्याचे कारण सांगितले. अशाच स्वरूपाच्या भावना अनेकजण बोलून दाखवत होते. थोडय़ाच दिवसांत चैत्यभूमीजवळच महामानवाचे भव्य स्मारक उभे राहणार या कल्पनेने भारावलेल्या हजारो-लाखो आंबेडकरभक्तांची पावले स्वाभाविकच इंदू मिलकडे वळत होती. चैत्यभूमीप्रमाणेच तेथेही मेणबत्त्या लावून भावनेची ओंजळ हे भक्त आपल्या देवासमोर अर्पण करीत होते.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhim ocean on dadar chaupati