भीमा-कोरेगाव, वढू येथील दंगलीचे तीव्र पडसाद मंगळवारी मुंबईत उमटले. बेछूट दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि त्यात जखमी झालेल्या बांधवांची माहिती मुंबईतल्या वस्त्यांमध्ये पोहोचली. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली.
मुंबई पोलीस दलातर्फे उपायुक्त सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार सकाळपासून शहरात काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलकांची समजूत काढण्यात पोलीस यशस्वी ठरले. या दरम्यान तोडफोड करणाऱ्या किंवा कायदा हाती घेणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. दगडफेकीत नुकसान घडल्याबद्दल गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शहरात सर्वात जास्त तणाव चेंबूर आणि घाटकोपरमध्ये होता. या भ्याड हल्ल्यामागे असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंसह अन्य आरोपींविरोधात गुन्हा नोंद होत नाही, त्यांना अटक होत नाही तोवर रस्ता मोकळा करणार नाही, अशी भूमिका घाटकोपर रमाबाई नगर, कामराज नगरातील आंबेडकरी जनतेने घेतली होती. कोंडीत अडकून पडलेल्या वाहनचालक, प्रवाशांना पाणी, चहा, बिस्किटांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती राहुल कांबळे या आंदोलनकर्त्यांने ‘लोकसत्ता’ला दिली.
अशाच प्रकारचा रास्तारोको विक्रोळीच्या कन्नमवार नगरात करण्यात आला. चेंबूरमधील आंदोलकांनी चेंबूर नाका येथे सायन-पनवेल मार्ग रोखून धरला. पवईत आयआयटी संकुलासमोर चक्का जाम करण्यात आला. गोवंडी, चेंबूर रेल्वे स्थानकांमध्ये लोकल रोखण्यात आल्या. शहरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, पवई या भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांच्या टायरमधील हवा काढण्यात आली.
ठाण्यातही आज रिक्षा-टॅक्सी बंद
ठाण्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांच्या संघटनांनी बुधवारच्या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा घेतला.
सर्वसामान्यांमध्ये घबराट
चेंबूरमधील वातावरण तापू लागल्यानंतर त्याचे पडसाद जसजसे समाजमाध्यमांवर उमटू लागले तसतसे सर्वसामान्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरू लागले. सर्वाधिक भीतीचे सावट मुंबईकर पालकांवर होते. सकाळीच शाळा-महाविद्यालयांत गेलेली मुले घरी सुखरूप परतू दे, अशा चिंतेत पालक होते. अनेक पालक एकमेकांशी, शाळा-महाविद्यालयांशी संपर्क साधून माहिती घेत होते.
विक्रोळीतील वृद्धाचा मृत्यू
विक्रोळी, कन्नमवार नगर दोनमधील इमारत क्रमांक १७६मध्ये राहाणाऱ्या चिंतामण मोरे (७२) यांचा भीमा-कोरेगाव दंगलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ओढवला. मोरे परिसरातील अन्य अनुयायांसह विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव येथे गेले होते. तेथे त्यांच्या वाहनावरही दगडफेक घडली. त्याचा धसका घेतल्याने मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू ओढवला, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.