मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार असून आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने मुदत ठेवींसंदर्भात (एफडी) श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यामध्ये महापालिकेने मोडलेल्या मुदत ठेवी, चालू मुदत ठेवी, तसेच सुमारे दोन लाख कोटीचे दायित्व याबाबतही खुलासा करावा, अशीही मागणी रईस शेख यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी दहा हजार कोटींनी कमी झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आमदार शेख यांनी पालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले की, महापालिकेचे आर्थिक दायित्व सुमारे दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. हे पालिकेच्या इतिहासात अभूतपूर्व असेच आहे. महापालिका विविध प्रकल्पांना निधी उपलब्ध करण्यासाठी आपल्या मुदत ठेवी मोडत असून महापालिकेच्या आर्थिक स्थितीबद्दल मुंबईकरांमध्ये अतिशय काळजीचे वातावरण आहे. त्यामुळे पालिका प्रशसानाने त्यांच्या मुदत ठेवींबाबत (एफडी) श्वेतपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा…आयआयटी मुंबईचा ‘ई-मोबिलिटी’अंतर्गत ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

श्वेतपत्रिकेमध्ये ३१ मार्च २०२४ रोजी असणाऱ्या मुदत देवी आणि ३१ डिसेंबर २०२४ रोजी असणाऱ्या मुदत ठेवी याचा रकमेसह तपशील देण्यात यावा. तसेच मुदत ठेवी मोडण्याची कारणे, मोडलेल्या मुदत ठेवींची संख्या, त्यांच्या तारखा आणि रकमांची माहिती श्वेतपत्रिकेत असायला हवी. त्यासोबत चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या ठेवींचे संपूर्ण विवरणही त्यामध्ये द्यावे, अशी मागणी शेख यांनी केली आहे.मोठमोठे प्रकल्प हाती घेतल्यामुळे पालिकेची दायित्वे वाढली आहेत. त्यामुळे पालिकेची सध्याची वचनबद्ध दायित्वे, मुदत ठेवींमधील रक्कम, गेल्या दोन वर्षांतील अंतर्गत कर्जे, दायित्वांची परतफेड करण्याची योजना आणि महापालिकेचे भविष्यासाठी एकूण आर्थिक व्यवस्थापन यासदंर्भातली सर्व माहिती मुंबईकरांना कळणे हा त्यांचा हक्क आहे, असा दावा शेख यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi east mla raees shaikh urged bmc to issue white paper on fds for upcoming budget mumbai print news sud 02