सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांची संपत्ती तीन वर्षांत २१ कोटी रुपयांवरून २१०० कोटींपर्यंत कशी वाढली, असा प्रश्न उपस्थित करीत भाजपचे राष्ट्रीय चिटणीस डॉ. किरीट सोमय्या यांनी भुजबळांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चौकशीला परवानगी देण्यासाठी का घाबरत आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली.
भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर भुजबळ यांनी २००९ मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका लढविल्या. त्यावेळी तिघांनीही निवडणूक आयोगाकडे त्यांच्या आणि कुटुंबियांच्या संपत्तीचा सर्व तपशील सादर केला होता. बँक ठेवी, समभाग, मालमत्ता आदींचे मूल्य २१ कोटी रुपये होते. सध्या भुजबळांच्या कुटुंबियांच्या नावे इंडोनेशियात कोळशाच्या खाणी, सिंगापूरमध्ये गुंतवणूक कंपनी, नाशिकमध्ये ऊर्जा प्रकल्प, नवी मुंबईत हेक्स वर्ल्ड गृहबांधणी प्रकल्प, सांताक्रूझ येथे गृहबांधणी प्रकल्प, नाशिक, पुणे, लोणावळा येथे बंगले व फार्म हाऊस, नाशिकमध्ये बागा, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे आदी ठिकाणी डझनावारी फ्लॅट एवढी संपत्ती आहे. त्याशिवाय आर्मस्ट्रॉंग एनर्जी, भुजबळ वाईन्स, भावेश बिल्डर्स, देविशा इन्फ्रास्ट्रक्चर आदी सुमारे १६ कंपन्या भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या आहेत. ही संपत्ती २१०० कोटी रूपयांहून अधिक असल्याचा सोमय्यांचा दावा आहे.
तीन वर्षांत एवढी प्रचंड संपत्ती कशी जमा केली? भुजबळ आयोगाशी खोटे बोलले की जनतेशी खोटे बोलत आहेत, अशी विचारणा सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केली.
भुजबळांच्या संपत्तीच्या चौकशीसाठी लाचलुचपत विभागाकडे सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यात प्रथमदर्शनी तथ्य वाटत असून चौकशीची गरज असल्याचा अहवाल विभागाने गृहविभागाकडे पाठविला आहे. तरी मुख्यमंत्री त्याला
परवानगी देत नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा