सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक शैलेश चांगले हे भ्रष्ट अधिकारी असून त्यांनी करोडो रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. त्यांच्यासह सुमारे तीन डझन अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांची बुधवारी भेट घेऊन केली.
अनेक ठिकाणी फ्लॅट्स चांगले यांना केवळ नऊ हजार रुपये पगार असताना त्यांचे कर्जत येथे आलिशान रिसॉर्ट, मुंबई आणि नाशिकमध्ये करोडो रुपये किंमतीचे फ्लॅट्स व अन्य मालमत्ता आहे. त्यांच्या उत्पन्नापेक्षा ती कितीतरी पटीने अधिक आहे. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, असे सोमय्या यांचे म्हणणे आहे.  भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह सहा मंत्र्यांच्या चौकशीचे पत्र देऊनही शासनाने अजून परवानगी दिली नसल्याचे सोमय्या यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणले आहे.
मालमत्ता वडिलोपार्जित
माझी मालमत्ता वडिलोपार्जित असून ती वडिलांनी १९८७ मध्ये खरेदी केली होती. त्याची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात दिली असून हे सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. सोमय्या यांनी राजकीय लढाईत सरकारी कर्मचाऱ्यांना ओढू नये आणि आमची वैयक्तिक बदनामी करू नये, असे स्पष्टीकरण चांगले यांनी केले आहे.

Story img Loader