मुंबई : दादर येथील प्रमोद महाजन कला उद्यानात पावसाळ्याचे पाणी साठवण्यासाठी तयार केलेल्या भूमिगत टाकीचे काम पूर्ण झाले असून त्या टाकीवर सुरक्षेचे सर्व नियम आणि उपाययोजनांचा विचार करुन गवत लावण्याबाबत अभ्यास करावा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. या उद्यानाचा लवकरच कायापालट करण्यात येणार असून नागरिकांना विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.

हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी तुंबून राहू नये म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने भूमिगत टाक्यांचा प्रयोग केला होता. या योजनेअंतर्गत हिंदमाता येथे उड्डाणपुलाखाली मिनी उदंचन केंद्र बांधून हिंदमाता परिसरात साठणारे पाणी पंपाद्वारे अन्य ठिकाणी वाहून नेण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. हिंदमाता येथील पाणी साठवण्यासाठी दादरच्या प्रमोद महाजन कला उद्यानात भूमिगत टाकी बांधण्यात आली होती. या उद्यानात तब्बल ६ कोटी लीटर क्षमतेची साठवण टाकी तयार करण्यात आली होती. हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला. मात्र या प्रकल्पामुळे महाजन उद्यानाचा काही भाग हा बंदच होता. तसेच या उद्यानाचे सुशोभिकरणही होऊ शकले नव्हते. आता या उद्यानाचे सुशोभिकरण पालिका प्रशासन हाती घेणार आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी या उद्यानाची पाहणी केली. यावेळी पालिकेच्या परिमंडळ २ चे उप आयुक्त प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रमोद महाजन कला उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास ते साठविण्यासाठी उद्यानामध्ये भूमिगत टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीवर सुरक्षेचे सर्व नियम आणि उपाययोजनांचा विचार करुन हिरवळ (लॉन) लागवडीसंदर्भात अभ्यास करावा. उद्यानात पुरेसा प्रकाश राहावा, यासाठी ठिकठिकाणी वीजेचे दिवे लावण्यात यावेत. उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उद्यानात आवश्यक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील. स्वच्छतागृह, वीज, पाणी आदी सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन दिल्या जातील. उद्यानाला अधिक सुंदर बनविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही यावेळी आयुक्तांनी उद्यानातील ’ज्येष्ठ नागरिक समूहाच्या सदस्यांना दिली.

Story img Loader