मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेलया, तसेच पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील दोन तुळया (गर्डर) रेल्वे भागात सरकविण्याची कार्यवाही महापालिकेतील अभियंत्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. हे आव्हानात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी पूल विभागातील अभियंत्यांचा सत्कार केला. अभियंत्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. दरम्यान, मुंबई महानगराच्या विकासात अभियंत्यांची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे गगराणी यांनी नमूद केले.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई १९ ऑक्टोबर २०२४ रोजी आणि उत्तर बाजूची लोखंडी तुळई २६ ते ३० जानेवारी २०२५ रोजी रेल्वे भागात सरकविण्याची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महानगरपालिकेच्या पूल विभागातील अभियंते आणि मध्य रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर मात करून तुळई सरकविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावलेले महानगरपालिकेचे उपप्रमुख अभियंता राजेश मुळे, कार्यकारी अभियंता सखाराम जाधव, सहायक अभियंता कुणाल वैद्य, दुय्यम अभियंता अभिषेक देवळेकर यांचा गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुंबईच्या विकासात अभियंत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मुंबईकरांचा प्रवास अडथळाविरहित आणि सुखकर करणारे पूल, रस्ते विभागातील अभियंता, कर्मचारी – अधिकारी म्हणजे महानगरपालिकेचा कणा आहेत. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीत दैनंदिन कामकाज करणे आव्हानात्मक आहे. अनेक अडचणी आणि आव्हानांवर मात करत अभियंते कामकाज यशस्वीपणे करत आहेत, असे गौरवोद््गार गगराणी यांनी काढले.
पूल विभागातील प्रकल्प किंवा योजना राबविताना अभियंत्यांचे तांत्रिक, तसेच प्रशासकीय कौशल्य पणाला लागते. अशा अभियंत्यांचे योगदान विचारात घेऊन त्यांच्या कामकाजाचे कौतुक व्हावे, त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने पूल विभागातील अभियंत्यांचा वैयक्तिक प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. भविष्यात या अभियंत्यांकडून महानगरपालिकेस अधिकाधिक उत्कृष्ट सेवा मिळेल, अशी अपेक्षा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केली.